खोपोलीत गॅस टॅंकर उलटला
सात तासांच्या प्रयत्नांनंतर गळतीवर नियंत्रण
खालापूर, ता. २ (बातमीदार) : पुण्याहून गुजरातकडे मोनोइथिलामाईन गॅसची वाहतूक करणारा टॅंकर खोपोली बाह्यमार्गावर उलटल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे टॅंकरमधून गॅसगळती सुरू झाली. बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सात तासांनंतर सुरू असलेली ही गळती नियंत्रणात आली. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अल्कली अमाईन्स कारखान्यातून गुजरात येथे निघालेला गॅस टॅंकर बुधवारी पहाटे अनियंत्रित झाल्याने खोपोली बाह्यमार्गावर उलटला. या अपघातामुळे टॅंकरवरील सेफ्टी व्हाॅल्व आणि पाठीमागे असलेल्या फ्लॅंजमधून गॅस गळती सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ या मार्गावरील वाहतूक बंद करून हेल्प फाउंडेशनचे रसायनतज्ज्ञ धनंजय गीध यांना पाचारण केले. घटनास्थळी खोपोली पोलिस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, अग्निशमन दल खोपोली, बोरघाट यांनी धाव घेतली. टॅंकरमधील गॅस ज्वालाग्राही असल्याने रसायन तज्ज्ञ धनंजय गीध यांना गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सेफ्टी व्हाॅल्वमधून गळती रोखण्यात आले, मात्र टॅंकरच्या पाठीमागील फ्लॅंजचे नुकसान झाल्याने गळती आटोक्यात येत नव्हती. या ठिकाणी अल्कली अमाईन्सचे पथकदेखील घटनास्थळी आले. अखेरीस फ्लॅंजमधून गळती थांबविण्यासाठी ब्लाइंड बसवण्यात आले. जवळपास सात तासांनंतर ही गॅसगळती नियंत्रणात आल्यानंतर हायड्राच्या सहाय्याने टॅंकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
गॅसचा तीव्र वास असल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. ज्वालाग्राही असल्याने पूर्ण खबरदारी घेऊन गळती थांबविण्यासाठी प्रयत्न केले. कृत्रिम ऑक्सिजनचीदेखील गरज भासली.
- धनंजय गीध, रसायनतज्ज्ञ, हेल्प फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.