शहापूर, ता. २ (वार्ताहर) : तालुक्यात कुपोषणाचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल २०३ बालमृत्यू आणि ३६ मातामृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. दुर्गम आदिवासीबहुल असलेला शहापूर तालुका कुपोषणासह माता व बालमृत्यूंच्या आकडेवारीवरून व्याधीग्रस्त ठरला आहे. कुपोषणाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी आणि बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींच्या योजना राबविण्यात येत असतानाही अशा घटनांना आळा बसलेला नाही.
माता व बालकांचे पोषण व्हावे, यासाठी सरकारच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दर महिन्याला शिबिर घेण्यात येते. तसेच अमृत आहार, पोषण आहार, जननी सुरक्षा, पंतप्रधान मातृत्व अनुदान अशा विविध योजना राबविल्या जातात. नियमित लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येत असतानाही मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. माता व बालकांसाठी पोषक ठरणाऱ्या योजना प्रामाणिकपणे राबवल्या जात नसल्याने आणि त्या योजनांमध्ये गैरव्यवहार होत असल्याने अनेक योजना प्रत्यक्षात न येता केवळ कागदावरच राहिल्या आहेत.
काय आहेत कारणे?
• कुपोषणासह कमी दिवसात जन्मलेले बाळ, कमी वजनाचे बाळ, इतर आजार गर्भावस्थेत निर्माण होतात.
• होणारी गुंतागुंत, श्वासोच्छवास कोंडणे अशा विविध कारणांनी ० ते ६ वर्षांच्या बालकांचे मृत्यू होत आहेत. तर रक्तक्षय, मुदतपूर्व प्रसूती, शारीरिक कमजोरी, हृदयविकार या कारणांमुळे मातामृत्यू होत आहेत. मात्र, यावर ठोस उपायोजना करण्यासाठी काहीच पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
• २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १५४ अर्भक मृत्यू, ४९ बालमृत्यू व ३६ मातामृत्यू झाले.
• विविध योजना व तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबिर राबविण्यात येत असतानाही बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यात प्रशासन अपयशी.
• बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव, गर्भावस्थेत करावी लागणारी रोजंदारी, बालविवाह या घटनाही माता व बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत.
• माता व बालकांचे पोषण व्हावे यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना कागदावरच राहिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.