किन्हवली, ता. २ (बातमीदार) : संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या निराधारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आता अनेकांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. महसूल विभागातील तलाठ्यांनी तालुक्यातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची तहसीलदार कार्यालयातील निराधार मदत कक्षात नोंद केली आहे.
शहापूर तालुक्यातील निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारच्या वतीने विविध योजनांचा सुमारे तीन हजार नागरिक लाभ घेत आहेत. अनेकदा चुकीच्या माहितीमुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही पात्र लाभार्थ्यांना आर्थिक लाभ मिळत नाही. परिणामी, अनेकांना तहसील कार्यालयात खेटा घालाव्या लागतात. यात आर्थिक झळ सोसावी लागते; तसेच वेळ व श्रमही वाया जातात.
शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासूळे यांनी राबविलेल्या या उपक्रमात महसूल विभागातील ५९ तलाठ्यांच्या माध्यमातून ११० ग्रामपंचायतींअंतर्गत येणाऱ्या गाव-पाड्यांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन तहसील कार्यालयातील निराधार मदत कक्षात नोंद केली. त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्यापासून बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड यांसह आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांचे ऑनलाइन अर्ज सादर केले. यामुळे शासकीय नियमात बसणाऱ्या तालुक्यातील विधवा, दिव्यांग, १८ वर्षांच्या आतील अनाथ बालके, ६५ वर्षांहून अधिक वयोगटातील निराधार अशा तब्बल ५७९ लाभार्थ्यांना आता लाभदायी योजनेतून आधार मिळणार आहे. दरमहा दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांच्या उदरनिर्वाहासह त्यांच्या औषधांची चिंता मिटली आहे.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून कोणी वंचित असतील, त्या निराधार नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा. तसेच, आपल्या कागदपत्रासह नोंदणी करावी.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.