प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १५ : गेल्या पाच वर्षांपासून वसई-विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. निवडणुकीला मुहूर्त मिळाला नव्हता, मात्र लवकरच बिगुल वाजणार आहे. त्याअगोदर मतदारांमध्ये आपली प्रतिमा बिंबवण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. पालघरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी व विजयी झेंडा रोवण्यासाठी शहरात पक्षीय स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अशातच ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राजकीय समीकरण बदलणार का, हेदेखील लवकरच समोर येणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर बहुजन विकास आघाडीची सत्ता अबाधित राहिली. त्यानंतर कोरोना काळापासून ते आजतागायत निवडणूक झाली नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागांमध्ये नागरिकांसह राजकीय मंडळींना विकासकामांसाठी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीत वसई आणि नालासोपारा मतदारसंघांचे चित्र बदलले होते. या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला. त्यामुळे या शहरी भागात संघटनावाढीसाठी जोमाने प्रयत्न सुरू झाले आहेत, तर बहुजन विकास आघाडीदेखील नव्या जोमाने कामाला लागली आहे.
निवडणुकीसाठी इच्छुक युवक सामाजिक कामांसाठी पुढे येऊ लागले असून, नागरिकांच्या हिताचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. रस्ते, गटारे यासह पाणी, वीज समस्यांसोबत नव्या योजना व कामे याकडे लक्ष दिले जात आहे. यासाठी प्रभागांमधून कार्यकर्ते महापालिका प्रशासनाची भेट घेणे, निवेदन देणे यासह पाठपुरावा करून आपल्या परिसरात कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.
दुसरीकडे भाजपनेदेखील महापालिकेत सत्ता मिळावी, यासाठी कंबर कसली आहे. गावा-गावांत, शहरात विकासाची कामे, उद्घाटन, भूमिपूजन याकरिता दौरे वाढू लागले आहे, तसेच थेट विधानसभेतदेखील नागरी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कामे आम्हीच केली, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांच्या माध्यमातून बिंबवले जात आहे. महापालिकेत आपल्या पक्षाची सत्ता यावी, यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. कामांची माहिती दिली जात आहे. प्रत्येक प्रभागामधून उमेदवाराचा चेहरा मिळावा, यासाठी शोध घेतला जात आहे. शिंदेंच्या शिवसेना गटानेदेखील संघटनावाढीकडे, तसेच प्रभाग रचना होण्यापूर्वी वॉर्डची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच पक्षप्रवेश, नवीन कार्यालये उघडण्यासाठीही वेग आला आहे.
येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महापालिकेने प्रभाग रचना व अन्य कामे हाती घेतली आहेत.
मराठी भाषिक मतदार महत्त्वाचे
महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची भूमिकादेखील निर्णायक ठरणार आहे. हिंदी भाषासक्तीला केलेला विरोध पाहता वसई-विरारमधील मराठी भाषिक मतदार आकर्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी नुकताच केलेला दौरादेखील संघटनावाढीला उभारी मिळण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाची लगबग
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील प्रभागाची २४ जुलैपर्यंत जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे, तसेच प्रभाग रचनेचा प्रस्ताव हा नगरविकास विभागाकडे ६ ऑगस्टपर्यंत देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्याने प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.
रणांगणात उतरण्यासाठी इच्छुकांची तयारी
अनेक पक्षांतून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, म्हणून अनेक इच्छुक तयारी करू लागले आहेत. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी नागरिकांची कामे, कार्यकर्त्यांची फळी उभी करणे यासह कार्यक्रमातून आपला चेहरा समोर आणणे, यासाठी जणू स्पर्धा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.