बाबांना हीच खरी श्रद्धांजली
भारतीय सैन्याचे ऑपरेशन महादेव; संजय लेले यांचा मुलगा हर्षल भावुक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना मारल्याच्या वृत्तानंतर दिवंगत संजय लेले यांचे पुत्र हर्षल यांनी ‘बाबांना आज खरी श्रद्धांजली मिळाली. कालच बाबांचा वाढदिवस झाला,’ अशी प्रतिक्रिया दिली. काल वाढदिवस झाला आणि आज या हल्ल्यातील दहशतवादी मारले गेले, असे तो अभिमानाने म्हणाला.
काश्मीर येथे भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव राबवित पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यावर प्रतिक्रिया देताना हर्षल म्हणाला, ‘भारतीय सैन्याचे आभार व्यक्त करतो. सरकारचेदेखील आभार मानतो. दहशतवादाविरोधातील ऑपरेशन त्यांनी सुरू ठेवले आहे. अनेकदा असे होते की काही गोष्टी घडतात आणि लोकांना नंतर त्याचा विसर पडतो; मात्र काश्मीरमधील हल्ल्याची दखल घेऊन दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अजूनही सुरू असल्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे. ज्यांनी आमच्या घरच्यांना मारले त्यांच्याविरोधात हे मिशन त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे. जोपर्यंत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत हे मिशन भारतीय सैन्याने सुरूच ठेवले पाहिजे. दहशतवादी हल्ले करतात आणि नंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसतात.’ दरम्यान, रविवारी (ता. २७) संजय लेले यांचा वाढदिवस झाला. ही आठवण सांगताना हर्षल म्हणाला, ‘बाबांचा कालच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाला मी दरवेळी केक आणायचो. काल असा पहिला वाढदिवस होता की ते आमच्यात नव्हते. सर्व नातेवाइकांचे फोन येत होते, पण बाबाच नव्हते, असे म्हणताना हर्षल भावुक झाला. काल बाबांचा वाढदिवस झाला आणि आज या हल्ल्यातील दहशतवादी मारले गेल्याचे समजले. हा योगायोग असला तरी बाबांसाठी ही खरी श्रद्धांजली आहे.’
क्रिकेट आणि हॉकी सामन्यावर बहिष्कार टाकावा
भारताने पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट आणि हॉकीच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला ‘खेळामध्ये राजकारण आणले नाही पाहिजे. पण ही दहशतवादी लोकं सुधारणाऱ्यांतील नाही आहेत. जोपर्यंत आपण यांच्यावरती पूर्ण बहिष्कार टाकत नाही, तोपर्यंत यांच्यात कोणतीही सुधारणा होणार नाही, असे तो म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.