कल्याण पूर्वेत पाणीप्रश्न पेटला
महापालिकेविरोधात भाजपचे रास्ता रोको आंदोलन; अधिकाऱ्यांनीच पाणी चोरल्याचा घणाघात
कल्याण, ता. २९ (बातमीदार) : महापालिका पाणीपुरवठा कल्याण पूर्व विभागामध्ये काही भागांत गेल्या काही वर्षांपासून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. कैलासनगर, खडेगोळवली, साईनगर, चिंचपाडा, नांदीवली व इतर भागांत पाण्याची परिस्थिती भीषण आहे. अनेक वेळा तक्रारी करूनदेखील परिस्थिती बदलत नसल्याने येथील त्रस्त नागरिकांसह महापालिकेच्या पाच ड प्रभाग क्षेत्र येथे पूना लिंक रस्त्यावर भाजपाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शहर अभियंत्यांच्या आश्वासनानंतर भाजपने दोन तासांनी आंदोलन मागे घेतले.
भाजपाचे माजी नगरसेवक मनोज राय यांनी मागील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांशी चर्चा करून आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार अखेर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेच्या वाट्याचे पाणी चोरून दुसरीकडे वळवल्याचा गंभीर आरोपही भाजपकडून केला. या वेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक मनोज राय, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी उपमहापौर विक्रम तरे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक, पदाधिकारी व जनसमुदाय उपस्थित होता.
नेतिवली प्लांटमधून निर्धारित पाणीपुरवठा व्हावा, असा ठराव मंजूर असताना कोट्याचे पाणी का दिले जात नाही? त्याचबरोबर फ्लो मीटर बसविण्याची मागणी करूनही तो अद्यापपर्यंत बसवला गेला नाही. मग यावर पाणीपुरवठा विभाग काय करीत आहे, असाही सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.
कल्याण पूर्वेला होणारा पाणीपुरवठा हा इतरत्र वळवला जात असल्याने येथील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी येथील पाण्याच्या टाक्यादेखील पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. असे असताना काही ठिकाणी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो. हा भेदभाव म्हणजे नागरिकांवर केला जाणारा अन्यायच आहे, अशा संतप्त भावना या वेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या.
पालिकेचे लेखी आश्वासन
महापालिकेच्या शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. आवश्यक मंजुरी पूर्ण करीत दोन महिन्यांत फ्लो मोटर बसविण्याचे नियोजन केल्याचे पत्रात म्हटले आहे. त्याकरिता आवश्यक ती मुदत द्यावी, अशी विनंती पत्रातून केली आहे. दरम्यान, महापालिकेने निर्धारित वेळेत पाणीप्रश्न सोडविला नाही तर उग्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
पाण्यावर होतोय पाण्यासारखा खर्च
कल्याण पूर्वेतील बहुतांश भाग हा बैठ्या चाळींचा तसेच झोपडपट्ट्यांचा आहे. अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. महापालिकेला पाण्याचा कर भरून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने बहुतांश नागरिक हवालदिल झाले असून, पाण्यासारखा पैसा खर्च करणे हे परवडणारे नसल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा
सुमारे दोन तास पूना लिंक रस्ता बंद असल्याने वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूस लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी झाली होती. लांब पल्ल्याच्या एसटी बसदेखील या कोंडीत सापडल्या होत्या. दरम्यान, आंदोलनकर्त्यांकडून रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग करून देण्यात आला. चढावरील भागात रास्ता रोको झाल्यामुळे असंख्य वाहनांचे क्लच प्लॅट जळून नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.