अकरावी-बारावीला इंटिग्रेटेडचा ‘फास’
अनेक महाविद्यालयांत अध्यापन प्रक्रिया बंद
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : विद्यार्थ्यांना अकरावी-बारावीसोबत अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करता यावी, मुंबईसह राज्यात कनिष्ठ महाविद्यालय आणि खासगी क्लासेसचा इंटिग्रेटेड पॅटर्न दिवसेंदिवस फोफावत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी शिक्षण विभाग अपयशी ठरत असून, त्यामुळे श्रीमंत विरुद्ध गरीब अशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची एक मोठी दरी निर्माण होत आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांशी संगनमत करून अनेक खासगी क्लासेसचालक इंटिग्रेटेड कार्यपद्धती राबवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता राहत नाही. गुणपत्रिकेवर महाविद्यालयांचे नाव आणि हजेरी भरण्याचा सोपस्कारही पूर्ण केला जातो. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये अध्यापन बंद झाल्याने मुंबईसह राज्यातील असंख्य महाविद्यालये संकटात सापडली आहेत. संस्थाचालकांनी आपल्या हितासाठी इंटिग्रेटेडला चालना दिली असून, त्यावर सरकारने ठोस कारवाई न केल्यास येत्या काळात कनिष्ठ महाविद्यालयांची अवस्था मराठी शाळांसारखी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
----
राज्यातील अनेक महाविद्यालयांनी क्लासेससोबत हातमिळवणी करून प्रवेश सुरू केले आहेत. यातून एक भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये अध्यापनच होत नाही. इंटिग्रेटेडची कार्यपद्धती ही अत्यंत गंभीर आहे.
- वैशाली बाफना, शिक्षण प्रमुख, सिस्कॉम
--
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे निकष काटेकोरपणे पाळले जात नसल्याचे आढळल्यास संबंधित शाळा-महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण
----
इंटिग्रेटेडचे दुष्परिणाम
- केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी नाही
- राज्यातील खासगी क्लासेससाठी धोरण नसल्याने गोंधळ
- इंटिग्रेटेडमुळे महाविद्यालयांमध्ये अध्यापनच थांबले
- महाविद्यालयात विद्यार्थी नसल्याने शिक्षक शिकवत नाहीत
- महाविद्यालये ओस पडत असल्याने विद्यार्थ्यांचा मोर्चा क्लासेसकडे
- मुंबई-पुण्यात सुमारे १५० हून अधिक इंटिग्रेटेड क्लासेस सुरू
--
बायोमॅट्रिक, सीसीटीव्हीचे पर्याय
- अनुदानित शाळा-महाविद्यालयांत बायोमेट्रिकसोबत सीसीटीव्ही लावल्यास ‘इंटिग्रेटेड’ला आळा बसेल
- शाळा-महाविद्यालयांनी वेळोवेळी पटपडताळणी केल्यास याबाबतचे वास्तव समोर येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.