डोंबिवलीत अमली पदार्थांबाबत जनजागृती
कल्याण, ता. ६ : ठाणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत डोंबिवली पोलिस ठाण्याच्या वतीने स. वा. जोशी महाविद्यालयात सायबर क्राईम व अमली पदार्थ जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांपासून सावध राहावे, तसेच पालक व शिक्षकांनी सजग राहून संवाद साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार, ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ बिवलकर यांच्यासह डॉ. विवेक पाटील व सुभाष सोनार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या उपक्रमाचा उद्देश तरुणाईमध्ये जनजागृती निर्माण करून सामाजिक समन्वयातून सकारात्मक बदल घडवणे हा होता. अभिनेते सतीश नायकोडी यांनी सूत्रसंचालन केले. दर महिन्याला अशी कार्यशाळा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
..............................
कामा संघटनेच्या अध्यक्षपदी नारायण माने
डोंबिवली : कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (कामा) अध्यक्षपदी उद्योजक नारायण माने यांची शनिवारी (ता.२) वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली. मागील २० वर्षे संघटनेचे सक्रिय सदस्य असलेल्या माने यांची ही अध्यक्षपदावर पहिलीच निवड आहे. नारायण माने हे डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स केमिकल कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. अन्य पदांवर निवड झालेल्यांमध्ये टेक्नोकेम इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक विश्वनाथ, घरडा केमिकल्सचे उपाध्यक्ष प्रशांत घोरपडे उपाध्यक्ष, ग्रासिम इंडस्ट्रीजचे सचिव कृष्णा यादव आणि युनिलॅबचे खजिनदार भास्कर सोनावळे यांचा समावेश आहे. ही निवड डोंबिवली एमआयडीसीतील कामा कार्यालयात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
.........................
डोंबिवलीत प्रथमच फ्रेंच कार्निव्हल
डोंबिवली (बातमीदार) : ‘ले ट्रेसोर ऑफ फ्रेंच’ या मुंबईतील अग्रगण्य फ्रेंच शिक्षण संस्थेच्यावतीने डोंबिवलीत प्रथमच फ्रेंच कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे फ्रान्सची रंगतदार संस्कृती थेट डोंबिवलीत अनुभवता आली. ५०० हून अधिक फ्रेंच भाषा प्रेमींनी सहभाग घेतलेल्या या कार्निव्हलमध्ये रोचक स्टॉल्स, पारंपरिक खेळ, तसेच फ्रेंच संस्कृतीची झलक अनुभवण्यास मिळाली. लहान मुलांनी खेळांचा आनंद घेतला, तर पालकांनी फ्रेंच भाषा शिकण्याची उत्सुकता व्यक्त केली. यावेळी ‘डीईएलएफ’ प्रमाणपत्र वितरण समारंभात २१ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषेची प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन संस्थापिका शिवानी शाह यांनी केले. गेल्या १२ वर्षांपासून त्या फ्रेंच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, विद्यार्थ्यांना भाषा शिकवण्याबरोबरच नवीन संस्कृती आणि जागतिक दृष्टिकोन देण्याचा त्यांचा उद्देश आहे. हा कार्यक्रम डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. भविष्यात असेच अनेक भाषा-केंद्रित उपक्रम होणार असल्याची माहिती शिवानी शाह यांनी दिली.
.......................
गांधारी पुलावर महावितरणच्या विद्युतवाहिन्यांना आग
कल्याण, (बातमीदार) : शहराच्या पश्चिम भागातील गांधारी पुलावर बुधवारी (ता.६) महावितरणच्या विद्युत वाहिन्यांना आग लागल्याची घटना घडली. या आगीत पारनाका आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सब स्टेशनवरून होणारा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, ५ ते ६ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, काही काळ परिसराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणकडून आग नियंत्रणात आणून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
............................
कल्याणच्या केएफसीएचे राष्ट्रीय स्तरावर यश
कल्याण(वार्ताहर) : कल्याण फिटनेस क्रिकेट अकॅडमी (केएफसीए) साठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. या अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत साकपाळ यांची डिफरेन्टली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाच्या इंडिया ब्ल्यू टीमसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही परिषद बीसीसीआयच्या सहकार्याने कार्यरत आहे. प्रशिक्षकासोबतच केएफसीएमधील तीन दिव्यांग खेळाडू रितेश गायकवाड, प्रसाद चव्हाण आणि ऋषिकेश येसपाटील यांचीही राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. हे खेळाडू डिफरेन्टली एबल्ड क्रिकेट असोसिएशन, मुंबईकडून खेळत आहेत. याबाबत माहिती डीसीए मुंबईचे सचिव कल्पेश गायकर यांनी दिली. या यशामुळे कल्याण परिसरात आणि क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. केएफसीएने गेल्या काही वर्षांत अनेक युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य घडवले, आणि हे यश त्या प्रयत्नांचे फलित आहे.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.