संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. ६ : समाजात अलीकडच्या काळात घडलेल्या काही विपरित घटनांनी एकीकडे पालक चिंताग्रस्त आहेत; तर तरुणाईमध्ये चलबिचल आहे. तरुणांकडे विनाकारण वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे, ही अनेकांसाठी विचित्र आहे. या बाबतीत पालकांना दिलासा मिळावा आणि युवकांनाही समजून घेता यावे, समजावून देता यावे, यासाठी तरुणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘वुई आर विथ यु’ (आम्ही तुमच्या बरोबर) ही चळवळ गावागावात पसरत आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये रविवारी (ता. ३) बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक तरुण या उपक्रमात सहभागी होत आहेत.
दोनतलाव गावातील युवकांची सभा आबेल डिमेलो यांच्या अंगणात नुकतीच आयोजित केली होती. दहावी ते पदवीधर, तसेच नोकरी करणारे असे एकूण ८० तरुण-तरुणी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे सभा तरुणांसाठी असली तरी काही पालकही अत्यंत जागरूकतेने या सभेला उपस्थित होते. प्रा. रुबिना डिमेलो यांनी विशेष सभेचे प्रयोजन विषद करून उपस्थितांना मुक्तपणे आपले विचार आणि मत व्यक्त करण्याचे आवाहन केले. तरुणांनी पालक आणि समाजाकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त केल्या. साहील डिमेलो या तरुणाने पालक-बालक संबंधावर प्रकाश टाकला.
पालकांचे मुलांना प्रोत्साहन असले, तरी बरेच जण मुलांवर फाजील अपेक्षांचे ओझे ठेवतात. मुलांच्या सर्वांगीण विकासाऐवजी त्यांच्याकडून फक्त परीक्षेतील गुणांची अवास्तव अपेक्षा बाळगतात. युवकांनी आपल्याला मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी त्यांच्या जीवनात एखादा गुरू असावा, अशी सूचनाही केली. मित्रमैत्रिणींचे दडपण या विषयीचे मत ब्लिज डिमेलो हिने मांडले. अशाच प्रकारचे विचार निओमी डिमेलो आणि एलीन डिमेलो हिने व्यक्त केले.
पालक प्रतिनिधी या नात्याने आशा डिमेलो यांनी त्यांच्यावर ओढवलेला डिजिटल ॲरेस्टचा प्रसंग कथन करून वयस्कांना सावध राहण्याचा सल्ला दिला. तसेच राजेश डिमेलो, जेमसन डिमेलो, ॲड. चार्लस डिमेलो, राजन डिमेलो, आबेल डिमेलो, ज्युली डिमेलो या पालकांनी आपापल्या परीने सूचनांद्वारे तरुणाईला मार्गदर्शन केले. यापुढेही असेच गावपातळीवर मेळावे भरवून युवाशक्ती अधिक मजबूत कशी करता येईल, याचाही विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तरुणांमधील गुन्हेगारीची भावना, ब्लॅकमेलिंग, सामाजिक दडपण, न्यूनगंड, मानसिक ताणतणाव यावर पालक हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. पालकांनीही मुलांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करण्यास पुढाकार घ्यावा.
- मेजर फ्रॅंकलिन डिमेलो, निवृत्त लष्करी अधिकारी
मुलांना आत्महत्यांबरोबरच अपघातांसारख्या जीवघेण्या गोष्टींपासून, तसेच विकृत गोष्टींपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले. तसेच सद्यःस्थितीने फार भांबावून न जाता काळाची आव्हाने ओळखून स्वतःला सक्षम बनवावे. सर्वात खात्रीची असलेली हेल्पलाईन म्हणजे आपले पालकच आहेत, हे लक्षात घ्यावे.
- फ्रान्सिस डिमेलो, आयोजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.