कर्करोग नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना
राष्ट्रीय कॅन्सर ग्रीडच्या वार्षिक बैठकीत विविध गोष्टींवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः देशभरातील कर्करोग संस्थांचे जाळे असलेल्या राष्ट्रीय कॅन्सर ग्रीडच्या (एनसीजी) २०२५ मधील वार्षिक बैठकीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कर्करोग नियंत्रणाच्या विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली. टाटा मेमोरिअल रुग्णालयात २ व ३ ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत १७ देशांतील ३० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह ३००हून अधिक कर्करोगतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या बैठकीत उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन, गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, परवडणारे कर्करोग संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल साधनांचा वापर आणि औषधांच्या किमती कमी करण्यावर भर देण्यात आला. एनसीजीने औषध कंपन्यांशी वाटाघाटी करून कर्करोग औषधांवर सरासरी ८५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवली असून, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयांपर्यंत दर्जेदार औषधे पोहोचवणे शक्य झाले आहे.
या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा यांच्यासह अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (ॲस्को), नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, एऑर्टिक (आफ्रिका) अशा आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत शिखर परिषदेत मांडलेल्या १० कलमी अजेंड्यानंतर या बैठकीत सहा आसियान देशांतील १४ तज्ज्ञ सहभागी झाले. बिम्स्टेकमधील तीन देशांतील प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठकीत डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. जी. के. राठ, डॉ. सुरेश अडवाणी आणि डॉ. जुली ग्रालो यांना एनसीजी लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.