अभ्युदय विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील अभ्युदय विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. गेली तब्बल २७ वर्षे सुरू असलेल्या या परंपरेला यंदाही विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. यावर्षी दहीहंडीचा सण १५ ऑगस्ट रोजी येत असल्यामुळे, विद्यालयात १४ ऑगस्ट रोजीच कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी व स्थानिक नागरिकांनीही उत्सवात सहभागी होऊन आनंदात भर टाकली. भगवान श्रीकृष्ण, राधा आणि गोपाळांच्या वेशातील बालमंडळी कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरले. टाळ्या, फुगे, ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गोविंदा आला रे आला’ च्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते. कार्यक्रमातील सर्वाधिक थर गाठून लहानगा गणेश गुळवे या बालश्रीकृष्णाने श्रीफळ फोडून दहीहंडी फोडली, त्याक्षणी सर्व गोपाळकुंजात आनंदाचा जल्लोष झाला. संस्थेचे अध्यक्ष आर. जी. हुले, संचालिका अलका हुले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.