बालरुग्णांना दिलासा
वाडिया रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाला परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : प्रगत अवयव प्रत्यारोपणाच्या नवीन योजनांसह वाडिया रुग्णालयाने मोठी झेप घेतली आहे. वाडिया रुग्णालयाने बालरोग हृदय प्रत्यारोपण करण्याचा कायदेशीर परवानादेखील मिळवला आहे. त्यामुळे असंख्य बालरुग्णांना प्रगत हृदयरोग सेवा देतील. रुग्णालय लवकरच स्वादुपिंड, आतडे आणि फुप्फुस प्रत्यारोपणाकरितादेखील परवाना मिळावा, यासाठी अर्ज करणार आहे.
जागतिक अवयवदानदिनानिमित्त बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाने आपल्या प्रियजनांचे अवयव निःस्वार्थपणे दान केलेल्या दात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला. या वेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला, डॉ. प्रज्ञा बेंद्रे, रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी तसेच अवयव दाते उपस्थित होते.
सांताक्रूझ येथे राहणाऱ्या १२ वर्षीय वैदेही भाऊ तानावडे हिला इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक पुरपुरा याचे निदान झाले होते. १३ जुलै २०२४ रोजी पहाटे, वैदेहीला अचानक अशक्तपणामुळे मेंदूसंबंधी बिघाड आणि रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला मेंदुमृत घोषित करण्यात आले व त्यानंतर तिचे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय दान करण्याचा निर्णय घेतला. मृत दाता वैदेहीची आई प्रणिता तानावडे यांना मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेली अनेक बालरुग्ण जगण्यासाठी प्रत्यारोपणावर अवलंबून असतात. भारतात बालरोग अवयवदानाविषयी आजही पुरेशी जागरूकता नसून प्रतीक्षा यादी वाढली आहे. एक अवयवदाता आठ जणांचे जीवन वाचवू शकतो आणि गंभीर आरोग्य स्थितीने ग्रासलेल्या रुग्णांना यामुळे जीवनाची नवी संधी मिळते. आतापर्यंत आठ यकृत प्रत्यारोपण झाले, त्यात सात जिवंत दाता आणि एक मृत यांचा समावेश आहे, तसेच आठ मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. यापैकी सहा जिवंत दाते आणि दोन मृत दात्यांचा समावेश होता. कॅडेव्हरिक मल्टी-ऑर्गन डोनेशनद्वारे दोन हृदय, सहा कॉर्निया, तीन यकृत आणि सहा मूत्रपिंडांसह गरजू रुग्णांना जीवन मिळाले. त्वचा, कॉर्निया आणि अॅम्निऑनसह ऊतींचे दानदेखील रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, वाडिया रुग्णालयाची अवयदानाची चळवळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि ही चळवळ आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाच्या वतीनेदेखील मदतीचा हात पुढे केला जाईल. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अवयव प्रत्यारोपणासाठी असलेले बजेट वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून, गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा. अवयवदानाविषयी नागरिकांमध्ये मोठ्या स्तरावर प्रबोधन करणे गरजेचे असून, त्यांच्या मनात अवयवदानाबाबत असलेली भीती दूर करणे गरजेचे आहे.
एकाच छताखाली सुविधा
बालरोग हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी रुग्णालयाला कायदेशीर परवाना मिळाला आहे, आमच्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याची आम्ही गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होतो. लवकरच स्वादुपिंड, आतडे आणि फुप्फुस प्रत्यारोपणाकरितादेखील परवान्यासाठी अर्ज केला जाणार असून, एकाच छताखाली प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होईल. राज्य सरकार आणि एमसीजीएम, सर्व दाते व त्यांचे कुटुंबीय या सर्वांचे मनापासून आभार मानते, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.