सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १८ : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. गेल्या २४ तासांत आठही तालुक्यांत मिळून ११२ मिमीच्या जवळपास पावसाची नोंद झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे वाहतुकीसह चाकरमान्यांची दिनचर्या मंदावल्याचे दिसून आले.
पालघर जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यातच आज म्हणजे सोमवारी (ता. १८) जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला होता. पालघर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये जूनपासून आतापर्यंत चांगले पर्जन्यमान झाल्याची नोंद आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास धरणामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. दोन्ही धरणांमध्ये २,५२८ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १८ मिमीच्या जवळपासच्या पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या इशारा पातळीजवळ येऊन ठेपल्या आहेत. वैतरणा नदीची इशारा पातळी १०१.९० मीटर असून, आता या नदीची पातळी ९९.८० मीटर आहे. पिंजाळ नदीची इशारा पातळी १०२.७५ मीटर असून, आता ही नदी १०१.९० मीटरवर आली आहे. देहर्जा नदीची इशारा पातळी ९८.७५ मीटर असून, ती ९४.२ मीटरपर्यंत आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुढे हा पाऊस असाच सुरू राहिला तर या तिन्ही नद्या इशारा पातळीजवळ येऊन ठेपण्याची शक्यता आहे.
लघू पाटबंधारे प्रकल्प भरले
माहीम केळवा, देवखोप, रायतळे, खांड हे चारही प्रकल्प १०० टक्के भरले असून, मनोर ९८ टक्के, तर मोह खुर्द ७१ टक्के भरले आहे. पालघर पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागअंतर्गत येत असलेले डोमहिरा व वाघ हे दोन लघू पाटबंधारे प्रकल्प २३ दलघमी भरले आहेत. डोमहिरा शंभर टक्के भरले असून, वाघ ९८ टक्के भरले आहे.
पाण्याची चिंता मिटली
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या मोडकसागर, तानसा व मध्य वैतरणा धरणामध्येही चांगला पाणीसाठा झालेला आहे. मोडक सागर धरण ८७ टक्के भरलेले आहे. तानसा धरण ९९ टक्के, मध्य वैतरणा ९७.२४ टक्के भरलेले आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या या तिन्ही धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने सध्यातरी मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
धरणातील पाणीसाठा (दलघमीमध्ये)
धरण उपयुक्त क्षमता आजचा पाणीसाठा
धामणी २७६.३५० २५५.२२१
कवडास ९.९६० ४.४६०
वांद्री ३५.९३८ ३३.६६५
मोडक सागर १२९.०१ १११.६८०
तानसा १४५.०८ १४३.३९०
मध्य वैतरणा १९३.५३ १८८.१८०
कुर्झे ३९.०५ २७.६३४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.