उरणकरांचा खिसा कचऱ्याने रिकामा
साठवण व्यवस्था नसल्याने वाहतुकीवर खर्च
महेश भोईर ः सकाळ वृत्तसेवा
उरण, ता. २१ ः जेएनपीटीच्या विस्तारीकरणामुळे उरण नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या कमालीची वाढली आहे. नागरी वस्त्यांमुळे नगरपालिका हद्दीतील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे; पण साठवण्याची व्यवस्था नसल्याने कचऱ्याची वाहतूक करावी लागते. त्यासाठी होणारा खर्च कोटीच्या घरात असल्याने कचराभूमी उभारण्यातील दिरंगाईची मोठी किंमत उरणकरांना मोजावी लागत आहे.
उरण नगरपालिका हद्दीतील कचरा २०२२ पूर्वी मोरा रोडकडे जाणाऱ्या हनुमान कोळीवाड्याच्या लगतच्या कचराभूमीत टाकला जात होता. त्यामुळे वाहतुकीवर खर्च कमी होत होता. त्या काळात वर्षाकाठी १.२५ कोटींचा खर्च नगरपालिका करीत होती; मात्र सद्यःस्थितीत नगरपालिका हद्दीतील १२ ते १५ टन कचऱ्याची वाहतूक तळोजा येथील कचराभूमीतील चाल येथे केली जाते. तर सिडको नोडमधून दिवसाला ५० ते ६० टन कचऱ्याची वाहतूक सिडकोकडून केली असल्याने वर्षाकाठी कोट्यवधींचा खर्च होत आहे.
----------------------------
बायोगॅस प्रकल्प बंद
उरण नगरपालिकेने २०२१-२२ बायोगॅस प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ३५ लाखांचा खर्च केला होता. या प्रकल्पासाठी नगरपालिका हद्दीतील ओल्या कचऱ्याचा वापर होत होता. बायोगॅसमधून ६० युनिटची वीजनिर्मिती होत होती. या विजेचा वापर नगरपालिका मुख्यालयासाठी केला जात होता. तसेच प्रकल्पामुळे कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाटमुळे पैशांची बचत होत होती; मात्र दीड वर्षांपासून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकल्प बंद पडला.
------------------------------
डेब्रिजचे डोंगर
सिडको प्रशासनाकडे उरण परिसरात हजारो एकर जागा आहे; मात्र सिडकोकडून उरण परिसरातील कचऱ्याच्या समस्येसाठी कचरा प्रकल्प राबविला जात नाही. उरण परिसरात सिडकोच्या जागांवर मुंबईचा कचरा आणून टाकला जातो. त्या परिसरात डेब्रिजचे डोंगरच्या डोंगर वसवले गेले आहेत; मात्र सिडको हद्दीतील ग्रामपंचायतींच्या कचऱ्यासाठी जागा दिली जात नाही.
----------------------------
नगरपालिकेची स्वतंत्र कचराभूमी होती; मात्र तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने बंद करावे लागले. आता सिडकोच्या कचराभूमीत हा कचरा घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- निखिल ढोरे, शहर अभियंता, उरण नगरपालिका
--------------------------
कचरा संकलनासाठीचा खर्च
विभाग संकलन ठेकेदार दिवसाचा खर्च वार्षिक खर्च (अंदाजित)
नगरपालिका १२ ते १५ टन ४,७०० ६० ते ७० हजार एक कोटी २५ लाख
सिडको ५० ते ६० टन १,९८० ८० ते ९० हजार एक कोटी १८ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.