लवकरच माणगाव नगर परिषद होणार
खासदार तटकरे यांचे आश्वासन; सीबीएसई शाळेच्या विकासकामाचे भूमिपूजन
माणगाव, ता. ३१ (वार्ताहर) ः माणगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, भविष्यात दक्षिण रायगडची राजधानी होण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे माणगाव शहराला आधुनिक बनविण्यासाठी नगर पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये करणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन खासदार सुनील तटकरे यांनी दिले. गेल इंडिया कंपनीने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या सीएसआरअंतर्गत अडीच कोटी रुपयांच्या निधीतून सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
माणगाव शहराचा औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास झपाट्याने होत आहे. माणगाव हे दक्षिण रायगडचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात पायाभूत आणि भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी माणगाव नगर पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये करणे गरजेचे आहे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मी पालकमंत्री असताना माणगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये केले होते. रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा या नगर परिषदांना १०० वर्षांचा इतिहास असला तरी माणगावची लोकसंख्या या नगर परिषदांपेक्षा जास्त आहे. माणगावची लोकसंख्या ही नगरपालिकेइतकी आहे. त्यामुळे माणगाव ही सुरुवातीला नगर परिषद होईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून जास्तीत जास्त नागरी सुविधा नागरिकांना देता येतील, असा आत्मविश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
.................
औद्योगिक प्रकल्पाचे काम जोरात
दिल्ली-मुंबई कॉरिडॉर औद्योगिक प्रकल्पाच्या माध्यमातून ३० हजार कोटी मंजूर केले आहेत. माणगाव तालुक्यातील महामार्गावरील गावांजवळ विविध प्रकारचे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. दिघी बंदर विकसित होत आहे. त्यासाठी किमान कौशल्यावर आधारित कोर्स सुरू करण्यात येत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लेदरचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. संगीत कला अकादमी सुरू करण्यात येणार आहे. माणगाव आणि रोहा शहरांत हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आले आहेत. नवे आधुनिक माणगाव घडविण्यासाठी सर्वांनी मिळूनमिसळून काम करण्याचे आवाहन या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.