विरार, ता. २७ (बातमीदार) : वसईतील रस्ते, उड्डाणपूल व रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांचा वेग वाढविण्यासाठी नुकतीच वसई-विरार महापालिका मुख्यालयात एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या पुढाकारातून बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाफाने फाटा-उमेळा फाटा, वसई फाटा-वसई गाव, सातिवली फाटा-रेंज ऑफिस, तिवरी फाटा-वामन ढाबा या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, गोखिवारा रेंज ऑफिस, एव्हरशाईन-वसंत नगरी व माणिकपूर नाका येथील उड्डाणपुलांच्या डिझाइनबाबत चर्चा झाली. ही तिन्ही कामे आठवड्याभरात प्रस्तावित होणार आहेत. याशिवाय, उमेळमान-नायगावसह चार महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांचा समावेश सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या बैठकीमुळे वसईतील पायाभूत सुविधांना गती मिळून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सांगितले. या बैठकीस एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भामरे, कार्यकारी अभियंता शेवाळे, पालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे आदी उपस्थित होते.