अपघातात अधू झालेल्या शुभमसाठी मदतीची याचना
मंडप डेकोरेटरच्या निष्काळजीमुळे घडली घटना
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील चिखले गावात मंडप उभारणीच्या कामावर असताना झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय शुभमने दोन्ही हात गमावले असून, पायाला गंभीररीत्या इजा झाली आहे. शिवाय मागील अनेक महिन्यांपासून तो कोमामध्ये असल्याने कुटुंबावर दु:खाचा तसेच आर्थिक संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे कुटुंबीयांकडून मदतीची याचना करण्यात येत आहे.
शुभम हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वंजारवाडीचा रहिवासी आहे. रोजगारासाठी त्याचे कुटुंब पनवेल तालुक्यातील नेरे येथील विहीघर येथे स्थायिक झाले. रिक्षा चालवून वडील कुंडलिक आंधळे यांनी कुटुंबाचा गाडा ओढला आणि दोन मुलांचे शिक्षणही सुरू ठेवले. शुभमने नुकतीच बारावीची परीक्षा देऊन उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती, मात्र १ मे २०२५ रोजी घडलेल्या अपघाताने त्याचे जीवन उद्ध्वस्त झाले. मंडप डेकोरेटर पंकज फडके याने सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता शुभमला धोकादायक कामावर नेले. मंडप उभारणीसाठी शिडीवर चढलेल्या शुभमचा हात वरून गेलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला लागला आणि क्षणात विजेचा जबर धक्का बसला. अपघात इतका गंभीर होता की, डॉक्टरांना त्याचे दोन्ही हात कोपरापासून तोडावे लागले. अपघातानंतर शुभमला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आतापर्यंत उपचारांवर आठ लाख रुपये खर्च झाला असून, पुढील उपचारासाठी १० ते १२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. रिक्षा चालवून एवढा खर्च भागवणे कुटुंबाला अशक्य झाले आहे. माझा मुलगा हाताशिवाय जीवन जगत आहे. तरीही देवाने त्याला वाचवावे हीच प्रार्थना आहे. सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी आर्त हाक शुभमचे वडील कुंडलिक आंधळे यांनी दिली आहे. दरम्यान, अपघातानंतर फडके याने उपचाराचा खर्च उचलण्याचे आश्वासन देऊन सही घेतली होती, प्रत्यक्षात फक्त ६० हजारांची मदत केली. त्यानंतर उलट धमक्या दिल्याचा आरोप आंधळे कुटुंबाने केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पनवेल तालुका पोलिसांनी पंकज फडके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.