मालमत्ता नोंदणीचा सुपर सप्टेंबर!
मुंबईत १२,०७० नोंदी; १,२९२ कोटी सरकारी तिजोरीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात काहीसे मंदीचे वातावरण असतानाही मालमत्ता नोंदणीच्या दृष्टीने सप्टेंबर महिना खऱ्या अर्थाने सुपर सप्टेंबर ठरला आहे. पितृपंधरवडा असतानाही एकाच महिन्यात तब्बल १२ हजार ७० मालमत्तांची नोंदणी झाली असून त्या माध्यमातून मुद्रांक शुल्काच्या रूपाने तब्बल १,२९२ कोटी रुपयांची भर सरकारी तिजोरीत पडली आहे. २०१३ नंतरची ही सर्वाधिक नोंदणी झाली आहे.
मुंबईत स्थावर मालमत्तांचे दर गगनाला भिडलेले असले तरी प्रत्येकजण मुंबईत घर खरेदी करण्यास पसंती देत आहे. परिणामी, घराच्या किमती वाढत असतानाही मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे नाईट फ्रॅंक इंडिया या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. सप्टेंबरमध्ये १२ हजारांहून अधिक मालमत्तांची नोंदणी झाली आहे. गेल्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांची वाढ झाली. तर मुद्रांक शुल्क संकलनात ४७ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. यंदा २ ते २१ सप्टेंबर या कालावधीत पितृपंधरवडा होता, त्याची भरपाई पुढील नऊ दिवसांत झाल्याने रेकॉर्डब्रेक मालमत्तांची नोंदणी झाल्या ‘नाईट फ्रॅंक’ने म्हटले आहे.
नऊ महिन्यांत ११ हजार कोटींचा महसूल
मुंबईत चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यांत एक लाख ११ हजार ९३९ एवढ्या मालमत्ता नोंदणी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसूल खात्यात ११ हजार १४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. दरम्यान, मालमत्ता नोंदणीमध्ये याच कालावधीत सहा टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली, तर महसूल २६ टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबईतील घर खरेदीची वैशिष्ट्ये
- खरेदीदार उच्च किमतीची घरे खरेदी करण्याकडे झुकत आहेत
- पाच कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या खरेदीत वाढ
- एक कोटीपेक्षा कमी किमतीच्या घर खरेदीत घट
- दोन ते पाच कोटींच्या किमतीची श्रेणी स्थिर
- एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांची नोंदणी स्थिर
.....
मुंबईतील घर विक्रीचा आलेख सातत्याने चढता आहे. सप्टेंबरमधील नोंदणीमध्ये मागील वर्षाचा विचार करता ३२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. पितृपंधरवडा असल्याने सप्टेंबरमध्ये सुरुवातीला कमी प्रतिसाद होता; मात्र त्यानंतर नवरात्री सुरू झाल्यानंतर खरेदीला गती आली. सध्याच्या रिअल इस्टेट बाजारात प्रौढत्व आणि कायमस्वरूपी विश्वास दर्शवते.
- शिशीर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाईट फ्रॅंक इंडिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.