विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी शिक्षिकेवर कारवाई करा
खासदार नरेश म्हस्के : अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
वाशी, ता. ७ (बातमीदार) : ऐरोलीतील सुशीलादेवी देशमुख या खासगी विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी अनुष्का केवळे (वय १६) हिच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या शिक्षिकेसह शाळा प्रशासनावर दोन दिवसांत गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.
परीक्षा काळात अनुष्काच्या बेंचखाली चिट्ठी सापडल्याने शिक्षिकेने कोणतीही खात्री न करता तिला कॉपी करत असल्याचे सांगत अवमानकारक व जातीवाचक भाषा वापरली. तसेच, संपूर्ण शाळेत तिची बदनामी केली. हा अपमान सहन न झाल्याने अनुष्काने मानसिक तणावातून आत्महत्या केली, असे उघड झाले आहे. या घटनेनंतर खासदार म्हस्के यांनी अनुष्काच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलिस व शाळा प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने त्यांनी पोलिस आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात भेट देऊन सदर घटनेची चौकशी करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
म्हस्के यांनी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने शाळा व्यवस्थापनाला निवेदन देऊन संबंधित शिक्षिकेचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची सूचना केली आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आवाज उठवत राहण्याची ग्वाही त्यांनी पालकांना दिली आहे. यावेळी शिवसेना ऐरोली विधानसभा शहरप्रमुख मनोज हळदणकर, नवी मुंबई जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, सिख समुदायाचे अध्यक्ष गगन कोली, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, राजू पाटील, उपशहरप्रमुख बंडू केणी, नवी मुंबई जिल्हा युवासेना प्रवक्ता प्रसाद घोरपडे, सागर चौगुले आदी उपस्थित होते.
------------------------
शिक्षकांच्या अपमानामुळे आत्महत्या : ॲड. प्रकाश आंबेडकर
तुर्भे (बातमीदार) : ऐरोलीतील सुशीला देवी (एस.डी.व्ही.) शाळेत दहावीच्या सराव परीक्षेत कॉपी केल्याच्या संशयावरून शिक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने अनुष्का केवळे या विद्यार्थिनीने ३ ऑक्टोबर रोजी रबाळे नोसिलनाका येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेजारच्या विद्यार्थ्याने फेकलेला कागदाचा गोळा अनुष्काजवळ आढळल्याने शिक्षकांनी तिला अपमानित केले होते.
या घटनेमुळे केवळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सोमवारी (६ ऑक्टोबर) वाशी येथील कामगार मेळाव्यासाठी आले असताना त्यांनी ही भेट घेतली व कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश वानखेडे, सुनील वानखेडे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे व समतासैनिक दलाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.