शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळेपुढे उपोषणाचा इशारा
हिंगोली जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना पत्र
मुंबई, ता. ७ ः हिंगोली जिल्ह्यातील अंतुलेनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने शाळेची कोणती माहिती न भरता थेट जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनाच हतबल केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे राज्याच्या शैक्षणिक इतिहासात पहिल्यांदाच एका शिक्षणाधिकाऱ्याने शाळेच्या समोर येऊन उपोषण सुरू करणार असल्याचे पत्र संबंधित मुख्याध्यापकास दिले आहे.
अंतुलेनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांपैकी निपुण महाराष्ट्रमधील प्रगती सादर केलेली नाही. तसेच एक पेड माँ के नाम, विद्यार्थी सुरक्षा समितीसह इतर उपक्रमांची माहिती विभागाच्या लिंकवर भरली नाही. यामुळे या मुख्याध्यापकाच्या वर्तनाने हतबल झालेले प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्हा परिषदेच्या अंतुलेनगर शाळेपुढे आपण ११ ऑक्टोबरपासून लक्षवेधी उपोषणाला बसत असल्याचे पत्र मुख्याध्यापकास लिहिले आहे. हे पत्र राज्यभर चर्चेचा विषय होत असून, यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वेळोवेळी सूचना देऊन मुख्याध्यापकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नाइलाज म्हणून उपोषण करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली.
दरम्यान, माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांनी शिक्षणाधिकाऱ्याचे हे वर्तन अतिशय बालिशपणाचे असल्याची प्रतिक्रिया नोंदवत अशा अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करून चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तर राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक-मुख्याध्यापकांचे जगणे मुश्किल झाले असून, एखाद्या उपक्रमासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने शाळेसमोर उपोषणाला बसण्यापेक्षा शाळेला पुरेसे शिक्षक दिले पाहिजेत, अशी मागणी केली.
कोट
शिक्षणाधिकाऱ्यांना खूप अधिकार आहेत. त्यांनी त्याचा वापर करून चौकशी करायला हवी. एखाद्या मुख्याध्यापकापुढे आपली हतबलता दाखविणे योग्य नाही. तसेच मुख्याध्यापकांनीही ही वेळ येऊ देऊ नये. आपण शाळांचे पूर्णवेळ प्रमुख असतो, याचे भान ठेवले पाहिजे. यामुळे अधिकारी उपोषणाला बसण्याची वेळ येणे खेदजनक आहे.
- विक्रम काळे, शिक्षक आमदार
सध्या लिंक भरणे, फोटो अपलोड करणे, माहिती भरणे यामुळे सर्व शिक्षक त्रस्त आहेत. एखाद्या उपक्रमाच्या असहकाराबाबत एवढी टोकाची भूमिका विचित्र वाटते. कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवणे पुरेसे झाले असते.
- महेंद्र गणपुले, शिक्षणतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.