सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : महापालिकेची पाणी देयके थकबाकी वसुलीकरिता पाणीपुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या वर्षी एप्रिलपासून आतापर्यंत ४३ कोटींची पाणी देयके वसूल झाली आहेत. हे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे १८ टक्के आहे. थकबाकी वसुलीकरिता सर्व प्रभाग समिती स्तरांवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाणी देयकाचा भरणा न करता, खंडित नळजोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास अशा पाणीचोरांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
ठाणे पालिकेच्या पाणी देयकांची एकूण रक्कम सुमारे २५० कोटींच्या घरात आहे. त्यापैकी ९२ कोटी २८ लाख थकबाकीपोटीचे आहेत, तर चालू वर्षाची देयक रक्कम ही १५७ कोटी ८० लाख रुपये आहे. पाणी देयकाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने २०२४-२५ या वर्षात पाणी देयकांपोटी १४८ कोटी ९५ लाखांची वसुली करण्यात यश मिळवले होते. ही वसुली २०२३-२४च्या तुलनेत १५ कोटींनी अधिक होती. या आर्थिक वर्षात पाणीपुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिलांची १०० टक्के वसुली करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे मंगळवारी (ता. २८) सायंकाळी बैठक झाली. उपनगर अभियंता विनोद पवार यांनी या बैठकीत वसुलीची स्थिती आणि कारवाईचे स्वरूप याबद्दल मार्गदर्शन केले. या बैठकीस सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता, मीटर रिडर आदी उपस्थित होते.
दर सोमवारी आढावा घेणार
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनात पाणी देयक वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. या वसुलीच्या मोहिमेचा आढावा पाणीपुरवठा विभागातर्फे दर सोमवारी घेतला जाणार आहे. त्यात अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. पाणी देयकांच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागांत नळजोडणी खंडित करणे, मोटार पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी देयकांची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
प्रभाग वसुली
नौपाडा-कोपरी ६,५४,०८,६६०
उथळसर ३,९३,७३,३६९
माजिवडा-मानपाडा ७,६०,८८,४३५
वर्तकनगर ४,६४,८०,४००
कळवा ३,२५,८२,९८३
वागळे २,२४,०२,८४०
लोकमान्य-सावरकर ३,५९,११,७२५
मुंब्रा ४,१३,६६,९८५
दिवा ४,२०,००,४५६
मुख्यालय-सीएफसी ३,४३,०६,७३०
एकूण ४३,५९,२२,५८३
महापालिका परिसरातील देयकांची आकडेवारी (रुपयांत)
मागील थकबाकी ९२ कोटी २८ लाख
चालू वर्षातील शिल्लक १५७ कोटी ८० लाख
चालू वर्षातील वसुली ४३ कोटी
देयकांची एकूण रक्कम २५० कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.