महावितरणच्या उपकेंद्रात अस्वच्छतेचे ठाण
नेरूळ (बातमीदार)ः सीवूड सेक्टर ४७ येथील महावितरण उपकेंद्र परिसर दुर्लक्षित आहे. पावसाळ्यात साचलेला पालापाचोळा स्वच्छ झालेला नाही. या साचलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. तर पालापाचोळा कुजल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. डासांची संख्या वाढल्याने डेंगी, मलेरिया सारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपकेंद्राची स्वच्छता करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष दळवी, विभाग प्रमुख अनिल पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ः------------------------------
वैज्ञानिक दृष्टीकोनातून अंधश्रद्धांचे निर्मूलन
नेरूळ (बातमीदार)ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवी मुंबई जिल्ह्यातर्फे कवी संमेलन पार पडले. कोपरखैरणेतील ज्ञान विकास महाविद्यालयातील संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत भाष्य करण्यात आले. यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून कवी उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महा.अंनिस. राज्य अध्यक्ष माधव बावगे, प्रमुख पाहुणे म्हणून अँड.खरगे, सार्थक सपकाळ, महा. अंनिस. राज्य सरचिटणीस आरती नाईक , महा अंनिस. सर्वेक्षण व संशोधन विभाग कार्यवाह डॉ. बालाजी कोंपलवार उपस्थित होते. अशोक निकम यांनी पाण्याने दिवा पेटवून कार्यकमाची सुरुवात केली.
ः--------------------------------------
शिरवणेत पदयात्रेतून स्वदेशीचा नारा
जुईनगर (बातमीदार): भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा व शिरवणे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर (ता.१५) सरदार पदयात्रा व नशा मुक्त भारत प्रतिज्ञा, स्वदेशी प्रतिज्ञा कार्यक्रम करण्यात आले होते. शिरवणे विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज मैदान येथून पदयात्रेची सुरुवात झाली असून जुईनगर, सानपाडा ते नेरूळ सेक्टर ११ या मार्गाद्वारे शिरवणे विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज मैदान येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, निलेश म्हात्रे, दत्ता घंगाळे, राजेश राय, शिरवणे विद्यालयाच्या प्राचार्या भाग्यश्री चौधरी, भाजपा मंडळ अध्यक्ष, महिला, पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ः---------------------------------------
शिक्षण विभागातर्फे मूल्यवर्धन कार्यक्रम
जुईनगर(बातमीदार): नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाप्रमाणे जिल्हा प्रशिक्षण संस्था राहटोली यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे मूल्यवर्धन कार्यक्रमाचे करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने ‘मूल्यशिक्षण’ या विषयांतर्गत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मूल्यशिक्षण विषयांमध्ये भारतीय राज्यघटनेत दिलेले मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. इयत्ता पहिली ते आठवी या सर्व वर्गांसाठी मूल्यवर्धन पुस्तकांचे शासनामार्फत वितरण करण्यात येणार असून पुढील पाच वर्षासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.