खारघर स्कायवॉक झळाळणार
पनवेल महापालिकेकडून चार कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प
खारघर, ता. २२ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने खारघर येथील स्कायवॉकवर ६३० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी पालिका ४ कोटी ५७ लाख ६३ हजार ७८४ रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पामुळे स्कायवॉक, सेक्टर ९ मधील सांडपाणी प्रकल्प तसेच सायन-पनवेल महामार्गावरील खारघर स्कायवॉक ते सीबीडी बेलापूर सीमारेषेवरील पथदिवे सुरू होणार आहेत. या प्रकल्पामुळे पालिकेची आर्थिक बचत होणार आहे.
सायन-पनवेल महामार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांच्या रहदारीतून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी सिडकोने ४० कोटी रुपये खर्च करून खारघर रेल्वेस्थानक ते भारती विद्यापीठ आणि बँक ऑफ इंडिया सर्कलदरम्यान टी आकाराचा १.७ किमी लांबी आणि चार मीटर रुंदीचा स्कायवॉक उभारला आहे. स्कायवॉक रात्रभर प्रकाशमान राहील. पहाटे ४ ते रात्री १२ या वेळेत त्याचा वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. त्यासाठी स्कायवॉकवर ६३० किलो वॉट क्षमतेचा सौरऊर्जा संच स्थापित करून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सेक्टर ९ मधील सांडपाणी प्रकल्पही या सौरऊर्जेवर कार्यान्वित केला जाईल. तसेच सायन-पनवेल महामार्गावरील खारघर रेल्वेस्थानक स्कायवॉक ते सीबीडी बेलापूर सीमारेषेपर्यंतचे पथदिवे सौरदिव्यांमुळे उजळणार आहेत.
निविदा प्रक्रियेला वेग
खारघरमधील स्कायवॉकवर ६३० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा संच स्थापित करून कार्यान्वित करण्यासाठी नुकतीच निविदा काढण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे स्कायवॉक, सांडपाणी प्रकल्प आणि खारघर स्कायवॉक ते खारघर सीबीडीदरम्यान महामार्गावरील सौर दिवे सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे पालिकेची आर्थिक बचत होणार आहे, असे पनवेल महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कटेकर यांनी सांगितले.