२१ प्रभागांत शिंदे गट विरुद्ध भाजप - राष्ट्रवादीची टक्कर!
बदलापूर निवडणुकीचे चित्र स्पष्ट
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २२ : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी (ता. २१) संपल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. २२ जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता ४९ जागांसाठी एकूण १६१ उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार आमनेसामने आहेत. बदलापूर निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे महायुतीमधीलच ‘आंतरयुती’ लढत होय. एका बाजूला शिवसेना (शिंदे गट) आणि दुसऱ्या बाजूला भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती या दोन घटक पक्षांमध्ये थेट सामना रंगणार आहे.
एकूण ४९ जागांपैकी २१ जागांवर शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप - राष्ट्रवादी युती अशी सरळ टक्कर आहे. या प्रभागांमध्ये दोन्ही गटांचे दिग्गज उमेदवार समोरासमोर आल्याने निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. पॅनेल २, ३ आणि २४ मध्ये प्रभाग ‘अ’ व ‘ब’मध्ये प्रत्येकी दोन-दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. यामुळे या तीन पॅनेलमध्ये चार-चार उमेदवारांचे सरळ द्वंद्व पाहायला मिळणार आहे.
राजकीय जाणकर मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवार असलेल्या पॅनेलमध्ये जिंकणारा उमेदवार किंचित फरकाने जिंकू शकतो. २ डिसेंबरला मतदान होणार असून, निवडणुकीचा नेमका कौल ३ डिसेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होईल. अंतिम यादीनुसार आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग येणार असून, बदलापूरची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
थेट लढत होणारे प्रभाग (एकूण २१)
पॅनेल १ (प्रभाग अ), पॅनेल २ (प्रभाग अ व ब), पॅनेल ३ (प्रभाग अ व ब), पॅनेल ४ (प्रभाग अ), पॅनेल ५ (प्रभाग ब), पॅनेल ७ (प्रभाग अ), पॅनेल ९ (प्रभाग अ), पॅनेल १० (प्रभाग अ), पॅनेल ११ (प्रभाग अ), पॅनेल १२ (प्रभाग अ), पॅनेल १४ (प्रभाग अ), पॅनेल १५ (प्रभाग ब व क), पॅनेल १६ (प्रभाग ब), पॅनेल २१ (प्रभाग ब), तसेच पॅनेल २२ व २४ मधील प्रभाग अ व ब.
बहुरंगी लढतींची स्थिती
काही पॅनेलमध्ये उमेदवारांची संख्या विक्रमी आहे, ज्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
पॅनेल क्रमांक उमेदवार संख्या
पॅनेल १० १० (सर्वाधिक)
पॅनेल १८ ९
पॅनेल ८ ८
पॅनेल १३ ८