‘एमआरआय’साठी खासगी प्रयोगशाळांसोबत करार
केईएम, नायरसाठी पालिकेने मागवले प्रस्ताव; पालिकेच्या दरात होणार चाचणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयासाठी खासगी प्रयोगशाळांसोबत करार केला जाणार आहे. यातून एमआरआय स्कॅनसाठी होणारी रुग्णांची गर्दी कमी होईल. पालिकेने प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी खासगी केंद्रांना स्वारस्य प्रस्ताव जाहीर केले आहेत. या उपक्रमामुळे मुंबईतील रुग्णांना एमआरआय तपासणीची सुविधा अधिक सुलभ उपलब्ध होऊन रुग्णांना सहा महिने वाट न पाहता समान किमतीत तपासण्या होतील.
पालिकेच्या अटी
एमआरआय स्कॅन सेवा पुरवण्यासाठी पात्र डायग्नोस्टिक सेंटरकडून स्वारस्य प्रस्ताव मागवले आहेत. यात इच्छुक डायग्नोस्टिक सेंटरकडे किमान १.५ टेस्ला क्षमता, ३२ चॅनेल्स आणि ४५/२०० ग्रेडियंटचे एमआरआय मशीन अनिवार्य आहे. केंद्र रुग्णालयापासून पाच किमी क्षेत्रफळात असणे आवश्यक असून, स्कॅननंतर एक्स-रे फिल्म्स व प्राथमिक अहवाल तत्काळ, तर अंतिम अहवाल २४ तासांत रुग्णालयाला देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला सहा महिन्यांचा करार, रुग्णालयात नवीन एमआरआय मशीन बसवले जाण्यापर्यंत कालावधी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली. शिवाय इच्छुक केंद्रे १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान निर्धारित कालावधीत त्यांचे प्रस्ताव सादर करू शकतात. साध्या एमआरआयसाठी २,५००, कॉन्ट्रास्ट एमआरआयसाठी ३,३०० असे दर निश्चित केले आहेत. आपत्कालीन रुग्णांसाठी त्वरित आणि इतर रुग्णांसाठी २४ तासांच्या आत अहवाल प्रदान केले पाहिजेत.
स्वारस्य प्रस्ताव मागविण्यात आला असून, तेदेखील त्याच दरात सेवा देणार आहेत. सध्या केईएममध्ये एकच मशीन आहे. सेवा २४ तास सुरू आहे. मात्र दिवसभरात २४ ते २५ एमआरआय होऊ शकतात. केईएमची रोजची ओपीडी संख्या सहा हजार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे.
- डॉ. संगीता रावत,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.
नायर रुग्णालयात एमआरआय किंवा स्कॅन दोन दिवसांत करून मिळत आहे. आम्ही छोटा सायन रुग्णालयाची यात मदत घेत आहोत. त्यामुळे या ठिकाणी प्रतीक्षा यादी नाही. स्वारस्य प्रस्तावात प्रयोगशाळा सहभागी होतील. त्यातून जवळपास केंद्र निश्चित होईल. ते पालिकेचे अधिकृत केंद्र राहणार असून, पालिकेच्या दरातच त्या ठिकाणी सेवा देण्यात येतील.
- डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, नायर रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.