जव्हार, ता. २३ (बातमीदार) : राज्यात नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका होण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार आणि प्रशासनासाठी विशेष नियम ठरवण्यात आले आहेत. या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास उमेदवाराला अपात्रतेच्या कारवाईसोबतच तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. उमेदवाराला एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जव्हार नगर परिषद निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आचारसंहितेदरम्यान सरकार व प्रशासन अधिकाऱ्यांनाही काही विशेष नियम पाळावे लागतात. निवडणूक खर्चाची मर्यादा नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या दर्जाप्रमाणे निश्चित केली गेली आहे. जव्हार नगर परिषद क वर्गात येत असल्याने नगराध्यक्षकरिता साडेसात लाख, तर सदस्यांकरिता अडीच लाखांची किमान खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चाचे हिशेब ठेवणे आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणे प्रशासनाला अनिवार्य आहे. जाहिरातीत लहान मुले, प्राणी किंवा पक्षी यांचा वापर करण्याबाबत काटेकोर नियम आहेत. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास विविध प्रकारच्या शिक्षा आहेत. उदाहरणार्थ, मते मागण्यासाठी लाच दिल्यास एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. या प्रकारे पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच संबंधित उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्रही केला जाऊ शकतो.
अधिकारी कर्तव्य
दोन उमेदवारांच्या मिरवणुका समोरासमोर येणार नाहीत, याची काळजी घेणे, उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब ठेवणे, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणे, आदर्श आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे.
सत्ताधाऱ्यांवर बंधने
कोणत्याही प्रकारचे वित्तीय अनुदान देण्याची किंवा त्याबाबतची घोषणा करू नये. कोणत्याही प्रकारचे प्रकल्प किंवा योजना निवडणूक प्रचारासाठी वापरू नयेत, रस्त्याचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आदींसाठी कोणतेही आश्वासन देऊ नये, सरकारच्या सार्वजनिक उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये कोणत्याही नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक काळात करू नये. शासकीय वाहने कर्मचारीवर्ग किंवा सरकारी यंत्रणा निवडणूक प्रचारासाठी वापरू नयेत. सत्ताधारी पक्षाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करू नये, इतर पक्षांवर अन्याय न करता निवडणुकीत सहभागी व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने हे नियम तयार केले आहेत.
राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी नियम
प्रचारामध्ये लहान मुले, प्राणी व पक्षांचा वापर करता येणार नाही. प्रचारासाठी छापण्यात येणाऱ्या साहित्यावर मुद्रणालय आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता आवश्यक. प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांत जाहिरात प्रसारित करण्याआधी निवडणूक विभागाने स्थापित केलेल्या समितीकडून ती तपासून घेऊन मंजूर करून घेणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.