नेरूळ सेक्टर १० मधील पदपथावर राडारोड्याचा अडथळा
नागरिकांचा संताप वाढला; उपाययोजनेची मागणी
जुईनगर, ता. ३० (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर १० परिसरातील पदपथावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राडारोडा पडून राहिल्याने स्थानिक रहिवाशांत प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहयोग आणि एकता सोसायट्यांच्या बाजूला असलेल्या जागेवर अलीकडेच काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. मात्र या कामाच्या दरम्यान निर्माण झालेला घनकचरा साफसफाईसाठी नेण्याऐवजी थेट पदपथावर टाकण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
सारसोळे बस स्थानक, रामलीला मैदान, तेरणा शिक्षण संकुल आणि अनाथाश्रम या परिसरात असल्याने येथे दिवस-रात्र नागरिकांची वर्दळ असते. सकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि नोकरीला जाणाऱ्या नागरिकांचा मोठा ओघ असतो. पदपथालगतच दोन बसथांबे असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी याच मार्गाने जावे लागते. मात्र राडारोड्याच्या ढिगाऱ्यावरून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना, खेळाडूंना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकांना रस्त्यावर उतरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढत आहे. तसेच पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कार्यपद्धतीवरदेखील रोष व्यक्त केला जात आहे. संपूर्ण परिसरात हे पथक दिवसभर गाडीने फिरत असते, तरीही इतक्या दिवसांपासून पदपथावर पडून असलेल्या राडारोड्याकडे कोणीच लक्ष का देत नाही, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. अनेकदा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शहरात अनधिकृत घनकचरा टाकला जातो, परंतु या प्रकरणात तर थेट दिवसाढवळ्या टाकलेला कचरा असूनही कारवाई होत नाही, याबद्दल रहिवाशी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.