बहुरूपी कलावंतांची भटकंती
डहाणू तालुक्यात पारंपरिक कलेचे घराघरात दर्शन
कासा, ता. ३० (बातमीदार) : वडिलोपार्जित पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी कर्नाटक, अमरावती आणि सोलापूर भागातून आलेल्या बहुरूपी कलावंतांची वर्दळ डहाणू तालुक्यात वाढली आहे. पावसाळा संपताच नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून ही मंडळी विविध गावांमध्ये आणि आठवडे बाजारांत आपली कला सादर करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात ते आजही विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या कलावंतांना राजाश्रय होता आणि ते गुप्तहेरगिरीचे कामही विविध रूपांमधून करीत असत. आजही हे कलाकार डोक्यावर देवीची मूर्ती, हातात साधनसामुग्री घेऊन आणि दोरीच्या सहाय्याने उघड्या अंगावर फटके मारत दारोदार आपली कला सादर करतात, अशी माहिती बहुरूपी कलावंत सुरेश कोल्हे यांनी दिली. राक्षस, विविध प्राणी, पक्षी, पोलिस, विदूषक अशा अनेक रूपांतून हे कलावंत लोकांचे मनोरंजन करतात. पूर्वी देव-देवतांची रूपेही घेतली जात होती; मात्र धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आता ती प्रथा टाळली जात असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. आजही ग्रामस्थ या कलाकारांना धान्य, रोख रक्कम तसेच साडी-चोळीचे दान देऊन त्यांच्या कलेला प्रोत्साहन देत आहेत.
दरम्यान, रखमाबाई ढोल वाजवत गुबुगुबू आवाज काढतात, तर सुरेश कोल्हे उघड्या अंगावर चाबकाचे फटके मारत कलेचे प्रदर्शन करतात. पारंपरिक कलेचे जतन व्हावे आणि पोटापाण्यापुरते मोजके पैसे मिळावेत, यासाठी बहुरूपी कलावंतांचा हा प्रवास आजही डहाणू तालुक्यात सुरू आहे.
इंटरनेटच्या युगात कलेचे आव्हान
बोईसर परिसरात बहुरूपी कलाकारांची अनेक कुटुंबे आजही वास्तव्य करून ही कला जपत आहेत. अमरावती जिल्हा आणि कर्नाटकातून येणारे कलावंत पावसाळा संपल्यावर डहाणू-पालघर परिसरात भटकंती करतात. दररोज वेगवेगळ्या गावांमध्ये कला सादर करून ते अंदाजे ६०० ते ८०० रुपये कमावतात. आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात या कलेकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वीइतके आकर्षण राहिले नाही. पुढील पिढी या कलेपासून दूर जात आहे. कदाचित आम्हीच या कलेची शेवटची पिढी ठरू, अशी भीतीही सुरेश कोल्हे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.