लोकभाषा व संस्कृतीचा जागर
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पालघर, ता. २५ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘बोलींचा जागर’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बोलीभाषा, लोककला व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रा व ग्रंथदिंडीने झाली. या वेळी ‘ बोली जगवा, बोली वाचवा, भाषा वाचवा, संस्कृती टिकवा’ हे ब्रीद घेऊन महाविद्यालयात बोलींच्या जतनाचे विचारमंथन झाले. भाषा जर टिकवायची असेल, तर शासनाची इच्छाशक्ती दांडगी पाहिजे आणि समाजगटांनी आपल्या भाषेसाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. बोली अभ्यासक डॉ. अंजली मस्करेन्हस यांनी बोलीचे स्वरूप सांगत बोलीत करता येणाऱ्या संशोधनावर प्रकाश टाकला. आपल्या व्याख्यानातून डहाणू परिसरातील लोकसाहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम केल्याची त्यांनी नोंद केली. महेंद्र हाडळ यांनी मल्हार कोळी बोलीतील ‘आगोठीची तयारी’ उपस्थितांसमोर सादर केली. ‘मी माझ्या शेतात, रानात, बांधावर जातो तिथे मला माझी बोली दिसते. एखाद्या नितळ ओढ्याचे पाणी प्यावे आणि ते गोड लागावे, अशी माझी गोडवा असलेली बोली आहे. तिला जिवापाड जपले पाहिजे’ असे प्रतिपादन हाडळ यांनी केले. तर मांगेला बोलीतून अमोल नाईक यांनी ‘जार गेला’ ही कथा सादर केली. त्यांच्या कथेतून मांगेला बोलीतील वसई परिसरातील अनेक दुर्मिळ शब्द उपस्थितांना ऐकायला मिळाले. महाराष्ट्र शासनाची या कार्यक्रमाबाबतची भूमिका अनुवादक प्रज्ञा भोसले यांनी मांडली. अस्मिता शिरगावकर सहाय्यक भाषा संचालक, गायत्री नरसाळे, रत्नमाला देवकते इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. डॉ. दर्शना चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. यादव मोरे, प्रा. नीलेश पाटील, सुवर्णा मंजुळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
--------------
चौकट
विविध नृत्यांचे सादरीकरण
धुकटण या गावातील रमेश डोवला आणि त्यांचे साथीदार आदिवासी बांधवांनी घोर नाच, टिपरी नाच सादर केला. शशिकला पोतनीस महाविद्यालय डहाणू येथील विद्यालयातील विद्यार्थिनींनी आदिवासी लोकगीते सादर केली. विष्णू हेमाडा यांनी मल्हार कोळी बोलीतून आपले अनुभव कथन केले. हर्षल पागधरे यांनी कोळीनृत्य सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.