दादा गेले अन् देवगिरी पोरका झाला...
दोन दशकांच्या आठवणी पडद्याआड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मलबार हिलमधील नारायण दाभोळकर मार्गावरील टुमदार शासकीय देवगिरी बंगला आणि अजित पवार यांचे नाते केवळ वास्तव्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते जिव्हाळ्याचे होते. १९९९मध्ये ते या बंगल्यात राहायला आले. मध्यंतरीची पाच वर्षे वगळता शेवटपर्यंत त्यांचे याच बंगल्यात वास्तव्य होते. या बंगल्यातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या आठवणी आहेत.
२०१४ ते २०१९ हा कालखंड वगळता अजित पवार यांचे वास्तव्य कायम देवगिरी बंगल्यात राहिले. २०२२मध्ये महाविकास आघाडी सरकार पडले; मात्र विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना हाच बंगला मिळाला. अजित पवार यांच्या बंगल्यावर काम केलेले संभाजी निकम सांगतात, ‘दादा पहिल्यांदा बंगल्यात राहायला आले तेव्हा या बंगल्याची देखभाल करणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची अवस्था वाईट होती. स्टाफ क्वार्टर मोडकळीस आली होती. अजितदादांच्या ते निदर्शनास आल्यावर त्यांनी पुढाकार घेऊन या गरीब कर्मचाऱ्यांसाठी दोन माळ्यांची स्टाफ क्वार्टर बांधून दिली. पोलिस चौकीही व्यवस्थित केली. मलबार हिलसारख्या श्रीमंत वस्तीत हे तात्पुरते कर्मचारी टूबीएचकेमध्ये राहत.
बगिचा फुलवला
देवगिरीमधील उजव्या बाजूला असलेला बगिचा त्यांनी स्वत: लक्ष घालून फुलवला. अनेक आवडीची झाडे त्यांनी लावली. बंगल्यातील प्रत्येक झाडावर जसे त्यांचे प्रेम होते तितकाच लळा त्यांनी या बंगल्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लावला हाेता. बगिच्यातील प्रत्येक झाडावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. त्यामुळे कुणी फुल तोडलेले त्यांना खपत नसे. परत असे करू नकोस, असे ते सुनावत. त्यांचे या बंगल्यावर एवढे प्रेम होते, की आवश्यकता असेल तरच भिंतीवर खिळे ठोका, अशी त्यांची स्पष्ट सूचना होती.
कर्मचाऱ्यांना वागणूक
आपण जसे राहतो तसेच बंगल्यातील कर्मचारी राहायला हवेत, असा त्यांचा आग्रह होता. दादा आमच्याशी फार बोलायचे नाहीत; मात्र आमच्यावर तसेच आम्हाला येणाऱ्या अडीअडचणींवर त्यांचे बारीक लक्ष असायचे, असे कर्मचारी सांगतात. बंगल्यातील स्वयंपाकगृहातील जेवण कर्मचाऱ्यांना वाढायचे हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे जेवणाचे डबे घेऊन येण्याची तसेच बाहेरून जेवण मागवायची कधीच आवश्यकता पडली नाही, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे जिथे दादा जेवायला बसायचे तिथेच आम्ही बसायचो. अनेक जण दादांना फटकळ म्हणतात; मात्र साध्या शिपायालाही त्यांनी कधीही अरे-तुरे केले नाही. ते आम्हाला ‘अहो-जावो’च करीत, अशी आठवण कर्मचाऱ्यांनी सांगितली.
शिस्तप्रिय
रात्री ठीक ११ वाजता देवगिरी बंगल्यातील त्यांच्या खोलीचे दिवे मालवले जात. सकाळी साडेपाच वाजता ते उठून व्यायाम वगैरे आटोपून सकाळी सातच्या आधी त्यांना वाचण्यासाठी वृत्तपत्र लागत. आठच्या आत त्यांचा हलकाफुलका नाश्ता आटोपायचा. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू व्हायचा. तो रात्री १०पर्यंत अखंड चालायचा. रात्री १०च्या आत ते जेवण घ्यायचे. आजपर्यंत कधीही दिवसा त्यांना झोपताना पाहिले नसल्याचे या ठिकाणी काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
वक्तशीरपणा
अजित पवार हे कमालीचे वक्तशीर होते. एक मिनिटाचा उशीरही ते खपवून घ्यायचे नाहीत. बंगल्यावर सकाळी ८ वाजता वेळ दिलेल्या व्यक्तीला दोन मिनिटे उशीर झाला तर ती व्यक्ती कितीही मोठी असू दे, त्याला पुन्हा वेळ घ्यायला लागायची. भेटायला येत असलेल्या लोकांतील एकही माणूस चहा-पाण्याशिवाय जाऊ नये, अशी त्यांची सक्त ताकीद असे. सुरुवातीला देवगिरीतील कर्मचाऱ्यांना दादांचा वक्तशीरपणाशी जुळवून घेताना धावपळ व्हायची; मात्र त्यानंतर सर्वांना सवय झाली. त्यांच्यामुळे आयुष्यात वेळेचे महत्त्व आम्हाला कळले, असे कर्मचारी सांगतात.
आनंदाचे क्षण
अजित पवारांचे आपल्या काकांवर विशेष प्रेम हाेते. देवगिरी बंगल्यात शरद पवार यांचे दोन वाढदिवस साजरे झाले. या दोन्ही क्षणी अजितदादांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळा होता. त्यातून त्यांचा काकांबद्दलचा आदर समजून यायचा.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.