रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू
जव्हार, ता. ४ (बातमीदार) : रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना विक्रमगड विधानसभा क्षेत्रात घडली आहे. जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा) या दुर्गम आदिवासी गावातील १८ वर्षीय शैलेश मगन वागदडा हा युवक गंभीर आजारी असताना मंगळवारी पहाटे त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. रस्त्याच्या अभावामुळे रुग्णाचा बळी गेल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तिलोंडा (आंबेपाडा) गावात आजही पक्क्या रस्त्याची सुविधा नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. शैलेशची प्रकृती बिघडल्यावर गावकऱ्यांनी त्याला डोली बांधून दवाखान्याकडे नेण्याचा प्रयत्न केला; मात्र खडतर डोंगरवाटांमुळे आणि विलंब झाल्याने त्याला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे गाव आदिवासीबहुल असून मूलभूत सुविधा आजही अपुऱ्या आहेत. पावसाळ्यात तर गावाचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकत नसल्याने रुग्णांना जीव धोक्यात घालून डोलीने वाहून न्यावे लागते. शैलेशच्या मृत्यूने ही विदारक परिस्थिती पुन्हा समोर आली आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून रस्ते व आरोग्य सुविधांसाठी मागणी करूनही प्रशासन, ग्रामसेवक व संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनेमुळे तालुक्यातील दुर्गम भागांतील आरोग्य व दळणवळण व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. युवकाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यासह मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
---------------
जव्हार तालुक्यात प्रत्येक गावात रस्ते व्हावेत, याकरिता वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधी उपलब्ध करीत असून, रस्ते व्यवस्था बळकट व्हावी म्हणून मागणी केली आहे.
- हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.