खारघर, ता. २३ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या हद्दीत वाढत्या लोकसंख्येला आणि सार्वजनिक वाहतुकीच्या गरजेला लक्षात घेऊन लवकरच प्रवासी बससेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बस मार्ग निश्चिती, संभाव्य प्रवासीसंख्या आणि बस डेपो उभारणीसाठी सविस्तर सर्वेक्षण करण्याकरिता खासगी तज्ज्ञ एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.
११० किमी क्षेत्रफळ असणाऱ्या पनवेल महापालिका हद्दीत सिडको वसाहत आणि २९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावांचे रूपांतर आता शहरात होत आहे. तसेच पालिका हद्दीत नवीन गृह प्रकल्पाच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, नवीन निवासी प्रकल्प आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना सक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक बनली आहे.
सध्या पनवेल परिसरात प्रामुख्याने एनएमएमटी, रिक्षा आणि खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रवास खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची बससेवा नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. पालिका हद्दीत बस सुरू करताना शहरातील प्रमुख मार्ग, प्रवासीसंख्या, तसेच शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके आणि व्यावसायिक केंद्रे यांचा अभ्यास करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे बसचे मार्ग, थांबे आणि वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
विशेषतः तळोजा एमआयडीसी, खारघर, तळोजा, कामोठे, नवीन पनवेल या भागांना जोडणाऱ्या मार्गांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच बस डेपो उभारण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याचे कामही एजन्सीकडे सोपविण्यात आले आहे. डेपोची जागा निवडताना बसच्या देखभाल, पार्किंग आणि ऑपरेशनल सोयी यांचा विचार केला जाणार आहे. भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन डेपोचे नियोजन केले जाणार आहे.
या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात सर्वेक्षण अहवालाच्या आधारे प्रत्यक्ष बस खरेदी, मार्ग अंतिमीकरण आणि सेवा सुरू करण्याचा आराखडा जाहीर केला जाणार आहे. नागरिकांमध्ये या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत असून, लवकरात लवकर बससेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोंडी घटण्यासाठी मदत
महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांना स्वस्त, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडीतही मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पर्यावरणपूरक बससेवा सुरू करण्याचाही विचार प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
परिवहन सेवा प्रकल्प राबविण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे मान्यतेसाठी पाठविले जाणार आहे. मंजुरी प्राप्त झाल्यावर पनवेल महापालिकेची परिवहन सेवा सुरू केला जाईल.
- कैलास गावडे, परिवहन व्यवस्थापक, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.