मुंबई जगातील सर्वात सुरक्षित शहर
पोलिस आयुक्त देवेन भारती यांचे मत
मुंबई, ता. २९ : ‘महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नागरिकांची शिस्त आणि त्यांचे पोलिसांना असलेले सहकार्य यामुळे मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे,’ असे मत मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी येथे व्यक्त केले.
इंडियन मर्चंट चेंबरतर्फे रविवारी (ता. २९) आयोजित पोलिस पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई पोलिस दलातील पाच महिला अधिकाऱ्यांसह ७० पोलिसांना गौरविण्यात आले. नागरिकांनी जबाबदारीने आपली वाहने पार्क केल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा बिकट प्रश्न सुटू शकतो, असेही त्यांनी सांगितले. देवेन भारती म्हणाले, की मुंबईतील प्रत्येक नागरिक गणवेश नसलेला पोलिस म्हणूनच वागतो आणि तो कुठल्याही गुन्ह्याची, दुर्घटनेची माहिती पोलिसांना त्वरेने कळवतो. त्यामुळे पोलिस तातडीने पावले उचलू शकतात. पोलिसांना अत्याधुनिक साधने मिळाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढली आहे आणि त्यांची प्रतिसाद यंत्रणाही तत्पर झाली आहे. हल्ली ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीत लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी फक्त ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असलेल्या तीन हजार घरांना भेटी दिल्या. त्यांच्याशी फक्त गप्पा मारण्याची भावनिक सेवादेखील सुरू केल्याचेही ते म्हणाले. पोलिस दीदी उपक्रमही लहान मुलांना त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करतो, असेही त्यांनी सांगितले.
..
कर्तव्यापलीकडे जाऊन जनतेची सेवा!
उत्कृष्ट तपास, गुन्ह्यातील व्यक्ती दोषी ठरणे, गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धाडसी कृत्य, अमली पदार्थविरोधी कारवाई, सायबर गुन्ह्यांचा तपास, वाहतूक पोलिसांचे चांगले काम अशा ११ गटांमध्ये या वेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आयएमसी शताब्दी ट्रस्टचे अध्यक्ष राम गांधी, उपाध्यक्ष महेंद्र चौहान, संचालक अजित मंगरूळकर उपस्थित होते. आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन जनतेची सेवा करणाऱ्यांचा गौरव व्हावा, या हेतूने हे पुरस्कार दिल्याचे राम गांधी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.