‘सुंदर गाव’ संकल्पना अयशस्वी
कुरगाव ग्रामपंचायतीला सांडपाण्याचा विळखा
बोईसर, ता. २ (वार्ताहर) : कुरगाव ग्रामपंचायत हद्दीत सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. राऊळनगर, मोतीनगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यांवर सांडपाणी साचल्याने ‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ची संकल्पना फोल ठरली आहे.
काही ठिकाणी गृहप्रकल्पांमधून सांडपाणी थेट उघड्यावर सोडले जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांवर साचलेल्या सांडपाण्याने पादचारी, चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत; मात्र कोणतीही ठोस उपाययोजना झालेली दिसत नाही. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.