विकासकामांना महासभेत मंजुरी
पावसाळी कामे, आरोग्य सुविधा व रस्ते दुरुस्तीला हिरवा कंदील; अतिक्रमण निष्कासन प्रस्ताव स्थगित
पनवेल, ता. २४ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या महासभेत पावसाळी कामे, आरोग्य सुविधा, रस्ते दुरुस्ती आणि विविध विकास प्रस्तावांना मंजुरी देताना अतिक्रमण निष्कासन प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सभेत शहराच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले.
सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, सभागृह नेते, समिती सभापती, विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विषयांवर सविस्तर चर्चा करत अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या वतीने जयंती, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी इमारती, रस्ते आणि चौकांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. नवीन पनवेल (पूर्व) सेक्टर १ येथे पावसाळी गटार उभारणीस मान्यता देण्यात आली. तसेच वृक्षारोपण, रोपांचे संगोपन आणि शहरातील हरितीकरणासाठी वार्षिक दराने काम करण्यास मंजुरी देण्यात आली.
बंदर रोड येथील १४ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राच्या दुरुस्तीला प्रशासकीय व आर्थिक मान्यता मिळाली. खारघर सेक्टर ३६ मधील मुख्य रस्ता ते स्वप्नपूर्ती गृहसंकुल आणि व्हॅलीशिल्पपर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणालाही मंजुरी देण्यात आली. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून विविध प्रभागांमध्ये पंप उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने नवीन पनवेल व खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डायलिसिस रुग्णांसाठी मेडिकल गॅस पाइपलाइन उभारण्यास मंजुरी देण्यात आली. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या विषयालाही हिरवा कंदील मिळाला. मात्र, अतिक्रमण निष्कासनासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठ्याचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला.
महापालिकेच्या वाहनांसाठी २०२६-२७ या वर्षात सुमारे ३.९६ कोटी रुपयांच्या इंधन खर्चास मंजुरी देण्यात आली. एकूणच, शहराच्या विकासाला चालना देणारे निर्णय या महासभेत घेण्यात आल्याचे दिसून आले.
चौकट
डायलिसिस सुविधांना बळकटी
नवीन पनवेल आणि खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डायलिसिस रुग्णांसाठी मेडिकल गॅस पाइपलाइन उभारण्याचा निर्णय हा या महासभेतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या सुविधेमुळे रुग्णांना अत्यावश्यक उपचार अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने मिळणार आहेत. खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी होऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
चौकट : महत्त्वाचे मुद्दे
विद्युत रोषणाईसाठी तीन वर्षांचा प्रस्ताव मंजूर
पावसाळी गटार व पाणी उपसा यंत्रणा कामांना प्राधान्य
एसटीपी दुरुस्ती व रस्ते मजबुतीकरणास मान्यता
आरोग्य केंद्रांमध्ये डायलिसिस सुविधांसाठी पाइपलाइन मंजूर
अतिक्रमण निष्कासन प्रस्ताव स्थगित
झोपडपट्टी पुनर्वसनाला हिरवा कंदील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.