उन्हाळी शिबिरात रमले विद्यार्थी
प्रभादेवी, ता. २६ (बातमीदार) : शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर स्थानिक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिरात विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेत विविध उपक्रमांचा आनंद लुटत आहेत. सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात विविध उन्हाळी शिबिराचे सत्र भरले असल्याने मुलांनी मैदाने गजबजून गेली आहेत. या उन्हाळी शिबिरात स्विमिंग, रायफल शूटिंग, चित्रकला, हस्तकला, खेळ, योगा, नृत्य, संगीत तसेच व्यक्तिमत्त्व विकास यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात सुरू असलेल्या मल्लखांब प्रात्याक्षिके, लाठीकाठी अशा प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपले कौशल्य दाखवून देत आहेत. प्रशिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करत आहेत.
लहान वयात मुलांना मैदानी खेळाची गोडी निर्माण व्हावी, तसेच पारंपरिक भारतीय युद्ध कलेचे महत्व समजावे आणि त्यातून आनंद मिळावा यासाठी लाठी काठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष भार्गव शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात सुरू असलेल्या रायफल शूटिंग, नेमबाजी, तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त विरधवल खाडे यांच्या स्विमिंग कोचिंगसाठी सध्या मुलांची गर्दी वाढत आहे, तर इतर उपक्रमामध्ये मुलांचा वाढता कल दिसून येत आहे.
--------------
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सहकार्याची भावना आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत पालकांनी व्यक्त केले. या उन्हाळी शिबिरामुळे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत, नव्या गोष्टी शिकण्याचा मौल्यवान अनुभव घेत आहेत.
---------------------
दरवर्षी समर्थ व्यायाम मंदिरच्या वतीने मल्लखांब शिबिर आयोजित करण्यात येते. याला ५ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंतचे वृद्ध सहभागी होतात. यावर्षी तुलनेने जास्त विद्यार्थी सहभाग झाले होते.
- उदय देशपांडे, मल्लखांब प्रशिक्षक
----------------
रोजच्या अभ्यासातून मुलांना मैदानी खेळाचीदेखील माहिती व्हायला हवी. आवड निर्माण व्हायला हवी आणि त्यातून त्यांचे आरोग्यदेखील सुदृढ राहण्यास मदत मिळते. यासाठी आम्ही दरवर्षी शिवाजी पार्क येथे उन्हाळी शिबिरात आमच्या मुलाला आवर्जून सहभाग घ्यायला लावतो.
- पंकज म्हात्रे, पालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.