मुंबई - विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी आज (ता. २६) मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्यानंतर चार जागांसाठी होण्याऱ्या निवडणुकीत सुशिक्षित मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता या निवडणुकीत असेल. विशेष म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघ २५ वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेकडे असल्याने भाजप शिवसेनेला आव्हान देते का हे या निवडणुकीत स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल महत्त्वाचा असल्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने या चार जागांसाठी जोर लावला आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत चार जागांसाठी मतदान होईल. तर या निवडणुकीची मतमोजणी एक जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंती क्रमाने मतदान होते. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी महायुतीने मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला आहे.
मुंबईत भाजपचे आव्हान
गेली ३० वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजपने यावेळी आव्हान दिले आहे. मुंबई पदवीधरमध्ये एकूण आठ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात होणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात १२ हजार पदवीधर उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत, या अनिल परब यांच्या आरोपामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबईतील एक लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य आज निश्चित करतील.
मुंबई शिक्षकमध्ये चौरंगी लढत
मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे हे पाच प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत.
कोकण पदवीधरमध्ये सरळ लढत
कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होत आहे. निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील भाजपची यंत्रणा लक्षात घेता काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदारांची नोंद झाली आहे.
नाशिक शिक्षकमध्ये २१ उमेदवार
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून एकूण २१ उमेदवार विधान परिषद निवडणुकीसाठी आपले नशीब अजमावत आहेत. तथापि मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे.
विशेष म्हणजे येथे सत्ताधारी महायुतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे उमेदवार आमने -सामने उभे आहेत. विशेष म्हणजे येथे भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात ६९ हजाराहून अधिक मतदार आहेत.
प्रमुख लढती
मुंबई पदवीधर -
अनिल परब (शिवसेना ठाकरे गट)
किरण शेलार (भाजप)
मुंबई शिक्षक मतदारसंघ -
ज. मो. अभ्यंकर (शिवसेना ठाकरे गट)
शिवाजीराव नलावडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिवनाथ दराडे (भाजप)
शिवाजी शेंडगे (शिवसेना पुरस्कृत)
सुभाष मोरे (समाजवादी गणराज्य पक्ष)
कोकण पदवीधर -
निरंजन डावखरे (भाजप)
रमेश कीर (काँग्रेस)
नाशिक शिक्षक मतदारसंघ -
किशोर दराडे (शिवसेना),
संदीप गुळवे (शिवसेना ठाकरे गट)
महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.