नांदेड : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. सदर गुन्हेगारांकडून दोन लाख ४६ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हदगाव बसस्थानकामध्ये शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी केली. त्याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना गुप्त माहिती मिळताच घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार सय्यद जाकिर सय्यद जाफर (वय २९) राहणार महेबूबनगर, नांदेड हा हदगाव बसस्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात श्री. चिखलीकर यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव येथे आपले एक पथक पाठविले. पथक प्रमुख फौजदार आशिष बोराटे यांनी त्यानंतर हदगाव बसस्थानकात सापळा रचून सराईत गुन्हेगार सय्यद जाकिर सय्यद जाफर यास पकडून त्याची चौकशी केली.
दरम्यान सय्यद जाफर यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ४६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये विमानतळ ठाणे अंतर्गतच्या घरफोडीतील अडीच तोळे वजनाचे १८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व २७.५ ग्रॅम वजनाची एक लाख २४ हजार ८९० रुपयाचे दागिने तसेच भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीतील १७.६ ग्रॅम वजनाचे ८२ हजार ८०० रुपयांचे दागिने व सहा ग्रॅम वजनाचे २७ हजार ६०० रुपयांचे दागिने असा एकूण दोन लाख ४६ हजार सातशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे, हवालदार गुंडेराव करले, अफजल पठाण, विठ्ठल शेळके, श्री. यादगिरवाड आणि हेमंत बीजेवार यांचा सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.