Cat Fish
Cat Fish 
सोलापूर

"हेलिकॉप्टर'मुळे बसतोय उजनीतील मच्छिमार व्यावसायिकांना फटका ! जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : विविध कारणांनी यापूर्वीच उजनीतील मासेमारी धोक्‍यात आली असताना, मांगूर जातीच्या माशानंतर आता आणखी एका नवीन प्रकारच्या उपद्रवी, घातक व विद्रूप सकर अर्थात हेलिकॉप्टर माशाची यामध्ये भर पडली आहे. हा मासा मोठ्या प्रमाणात उजनी जलाशयात सापडू लागल्याने इतर माशांच्या प्रजाती धोक्‍यात तर आल्या आहेतच शिवाय मच्छिमारांच्या जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागल्याने मच्छिमारही हैराण झाले आहेत. 

सकर माशाचे उगमस्थान तसे अमेरिकेतले आहे. कालांतराने मुबंई खाडीत व वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळून आला होता. तेव्हापासूनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्‍याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वांत मोठे असणाऱ्या उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे. मुळात तर या माशाची ओळख फिश टॅंकमधील शोभिवंत मासा म्हणून होती. मात्र फिश टॅंकमध्ये अनेक शोभिवंत माशांनी प्रवेश केल्यानंतर व पाळणाऱ्यांची हौस फिटल्यानंतर हा मासा खाडीत व नदी सोडून देण्यास सुरवात झाली. 

या माशाची वाढ जलदगतीने तर होतेच शिवाय हा मासा मिश्राहारी असल्याने तो शेवाळ्यांबरोबर इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. हा मासा टणक असल्याने इतर माश्‍यांपासून हा सकर (हेलिकॉप्टर) मासा सुरक्षित राहतो. साहजिकच त्यांच्या संख्येत जलदगतीने वाढ होते. शिवाय पाण्याच्या बाहेर आला की तो जमिनीवर सापाप्रमाणे नागमोडी चालतो. तसेच पाण्याच्या बाहेर चार ते पाच तास जिवंतही राहू शकतो. संपूर्ण अंगाला काटे असल्याने या माशाला ग्राहक मात्र मिळत नाहीत. 

असा हा सकर (हेलिकॉप्टर) मासा उजनीत थोड्या संख्येने नव्हे तर मोठ्या संख्येने आढळून येऊ लागला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही. त्यासाठी जाळी फाडावी लागत आहे. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान सध्या होताना दिसत आहे. शिवाय बाजारपेठेत या माशाला मागणी नसते. सध्या शेकडोंच्या संख्येने हा मासा उजनीत सापडू लागल्याने मच्छिमारांच्या चिंतेत भर पडली आहे. मुळात उजनीचे वाढते प्रदूषण, बेकायदेशीर व व्यावसायिक मासेमारी यामुळे उजनीतील मासेमारी धोक्‍यात सापडली असताना, आता या सकर माशाची भर पडली आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने वेळीच धोका ओळखून सकर मासे नष्ट करण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. 

काही दिवसांपूर्वी उजनी जलाशयाच्या कोंढार चिंचोली येथे मच्छिमारांना जलाशयाच्या पाण्यामध्ये सोनेरी कासव सापडले होते. त्यानंतर केत्तूर परिसरातील जलाशयाच्या फुगवट्याच्या पाण्यात एका शेतकऱ्याला पाणमांजर दिसले होते. तर उजनी जलाशयात यापूर्वी कधीही न दिसलेला जिताडा जातीचा मासा प्रथमच सापडला होता. 

सकर माशाची वैशिष्ट्ये 
सकर माशामध्ये फुफ्फुसे असतात म्हणून यांना लंग फिश (lung fish) म्हणतात. या माशामधील पर हे पंख्यासारखे असतात. कधी कधी हे मासे पाण्यातून बाहेर येऊन सुमारे फूट दीड फूट हवेत उडून हवेतील हवा फुफ्फुसामध्ये भरून घेतात. पाण्यातून बाहेर येत असल्यामुळे यांना फ्लाइंग फिश तर कधी कधी हेलिकॉप्टर मासा म्हणून ओळखतात. श्वसनासाठी कल्ले पण असतात. हा मासा कॅट फिश (cat fish) या ग्रुपमध्ये मोडतो. संपूर्ण अंगावर काटेरी खवले असतात व परांना लांब काटे असतात. जाळीत सापडल्यावर या माशांना अलग करणे कठीण काम आहे. बोरीच्या काट्यांसारखे काटे असल्यामुळे जाळीत गुंतून राहतात. एक्‍झोसीटस (exocetous) या वैज्ञानिक नावानेही हा मासा ओळखला जातो. 

कॅट फिश गणातील सकर माशाला इंग्रजीत "सकर माऊथ कॅट फिश' या नावाने ओळखतात. या माशाचे तोंड गोलाकार असून त्याचा कडा चिकट द्रव स्राव करणाऱ्या ग्रंथींनी भरलेले असतात. पाण्यातील शेवाळ हे या माशाचे प्रमुख खाद्य आहे. शेवाळ्यांना चिकट द्रवाच्या मदतीने चिकटून राहात खाद्य कुरतडून खातात. कॅट फिश गणातील माशांमध्ये फुफ्फुसे असल्या कारणाने हे मासे पाण्याबाहेर काही काळ श्वसनाद्वारे जिवंत राहू शकतात. 
- डॉ. अरविंद कुंभार, 
प्राणिशास्त्र अभ्यासक 

विविध देशी-विदेशी पक्षी सौंदर्याबरोबरच उजनी जलाशयाच्या पाण्यात जैवविविधताही मोठ्या प्रमाणावर असल्याचे वारंवार दिसून आले आहे. या सर्वांचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. 
- कल्याणराव साळुंके, 
पक्षी निरीक्षक 

स्थानिक बाजारपेठेबरोबरच मच्छी मार्केटमध्येही या सकर माशांना मागणी नाही. तसेच त्याचे दर 30 ते 40 रुपये प्रतिकिलो असे आहेत. हे मासे सापडले तरी आम्ही त्यांना पुन्हा पाण्यात सोडून देतो. 
- सोमनाथ कनिचे, 
मच्छिमार, केत्तूर 

या प्रकारचे मासे जाळ्यात अडकल्यानंतर जाळ्यातून काढणे मोठे अवघड काम आहे. मासे काढताना जाळे फाटून नुकसान होत आहे. 
- लोकेश परदेशी,
मच्छिमार, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT