बेळगाव : बेळगाव शहरातील नोटीस बजाविलेल्या तळघरांवर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांनी ही माहिती दिली आहे. विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. बेळगाव शहर व जिल्ह्याचा समावेश वायव्य शिक्षक व पदवीधर मतदारसंघात असल्यामुळे या निवडणुकीची आचारसंहिता बेळगावला लागू झाली आहे.
दरम्यान, आचारसंहिता संपेपर्यंत तळघरांवर कारवाई करणे शक्य नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी जिल्हाधिकारी तथा प्रशासक नीतेश पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आचारसंहितेपर्यंत तळघरांचा विषय बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय आता तळघरांना सरसकट नोटीस देणेही बंद करण्यात आले आहे. पाहणीवेळी एखाद्या तळघरामध्ये आस्थापन आढळून आल्यास नोटीस दिली जात आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापारी संकुलातील तळघरांना नोटीस देण्याची मोहीम महापालिकेने २० मे रोजी सुरू केली होती. पहिल्याच दिवशी ३० तळघरांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर २१ व २३ मे रोजीही नोटीस बजावण्यात आली होती. आतापर्यंत ५० हून अधिक तळघरांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.
तळघरांमधील आस्थापने हटविण्यासह ती जागा वाहनांच्या पार्किंगसाठी खुली करण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र, या नोटिसीला अद्याप तळघर मालकांकडून प्रतिसाद मिळालेला नसून तळघरांमधील आस्थापने हटविण्यात आलेली नाहीत. शिवाय नोटीस बजावण्यास सुरुवात होताच महापालिकेवर राजकीय दबावही टाकण्यात आला. दरम्यानच्या काळात विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे महापालिकेने सरसकट नोटीस बजाविण्याची मोहीम थांबविली. शिवाय निवडणूक झाल्यावरच कारवाई घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तळघरमालकांना काही काळ दिलासा मिळाला आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतच तळघरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत पार्किंग व वाहतूक कोंडीची समस्या आहे. या समस्येची माहिती घेतल्यावर प्रशासक नितेश पाटील यांनीच तळघरांना नोटीस बजावण्याची सूचना महापालिकेला दिली होती. याआधीही अनेकदा महापालिकेने तळघरांवर कारवाईचा प्रयत्न केला, पण त्यात यश आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.