कोल्हापूर - सर्वत्र लगीनघाई, मित्र-परिवाराचा सळसळता उत्साह असला तरी त्याच्याही पलीकडे जाऊन वीटभट्टीवरील शंभरहून अधिक कामगारांच्या साक्षीने नुकताच मार्केट यार्ड परिसरात एक विवाह सोहळा झाला. सतत दुर्लक्षित व राबणाऱ्या हातांच्या आशीर्वादाबरोबरच नवदाम्पत्याने अवयवदानाचा संकल्प करून त्याचे फॉर्मही भरले. मुक्त सैनिक वसाहतीतील सृजन आनंद विद्यालयातील क्रीडाशिक्षक शमुवेल सौंदडे यांच्या विवाहाच्या निमित्ताने या विधायक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. रिना शिंदे (बीड) यांच्याशी शमुवेल यांचा विवाह झाला.
सृजन आनंद विद्यालय ही प्रसिद्ध शाळा. या शाळेत शिक्षक आणि शिक्षिकांना ताई-दादाच म्हटले जाते. याच शाळेत शमुवेल क्रीडाशिक्षक म्हणून काम करतात. विवाहाच्या निमित्ताने त्यांनी वेगळा पायंडा पाडण्याचा संकल्प केला आणि वीटभट्टीवर स्वतः जाऊन तेथील कामगारांना निमंत्रण दिले. वीटभट्टीच्या भाषेत ज्याला आळी म्हणजे जोडी म्हणतात, अशी दाम्पत्येही आवर्जून उपस्थित होती. शमुवेल यांनी अवयवदानाची संकल्पना पत्नी रिना यांना सांगितली. त्या स्वतः नर्स असल्याने त्यांनीही लगेचच होकार दिला.
मतदारराजा जागा हो...
विवाहपत्रिकेच्या माध्यमातूनही शमुवेल यांनी विविध सामाजिक संदेश दिले. ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’ असे संदेश त्यांनी पत्रिकेतून दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.