पश्चिम महाराष्ट्र

गावात पंच... हॉटेलमध्ये रूमबॉय...

सुधाकर काशिद

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले, निवडून आलेल्यांच्या रोज जेवणावळी सुरू आहेत. त्यांच्या मते कार्यकर्ते, स्नेह्यांच्या श्रम परिहारासाठी जेवण घातलं, तर काय झाल; पण निवडून आलेल्यांमध्ये एक ग्रामपंचायत सदस्य असा आहे, की निकाल लागल्यावर दोन दिवसांत कामावर म्हणजे एका हॉटेलात रूमबॉय म्हणून पुन्हा हजर झाला. गावात गेल्यावर ग्रामपंचायत सदस्य आणि हॉटेलात रूमबॉय, अशी भूमिका तो बजावतो. लोकशाहीची फळे कुठवर रुजली, कशी रुजली यावर जरुर उलटसुलट चर्चेला वाव आहे; पण हॉटेलमधल्या या एका रूमबॉयला जरूर लोकशाहीने संधी दिली.

आनंदा रामचंद्र भोसले या आगळ्या-वेगळ्या पठडीतील रूमबॉयच्या वाटचालीची ही कथा आहे. तो शाहूवाडी तालुक्‍यातील वरेवाडीचा. घरची परिस्थिती जेमतेम. त्यामुळे ११ वर्षांपूर्वी म्हणजे तो अकरावीला असताना कोल्हापुरात पॅव्हेलियन हॉटेलात कामाला लागला. ‘‘आनंदा हे आण, आनंदा ते कर, आनंदा हे साफ कर असली सगळी कामे मनापासून करू लागला.
साधारण मोठ्या हॉटेलात वेटर किंवा रूमबॉयला टीप द्यायची पद्धत आहे; पण या आनंदाचे वैशिष्ट्य असे, की आपल्या पगारातला पैसा तो गावाकडच्या गरजूंना आवर्जून द्यायचा. गावाकडचे कामाच्या निमित्ताने कोण कोल्हापुरात आले, तर त्यांच्यासाठी इकडे तिकडे ओळख काढून धडपडायचा. कोल्हापुरात हॉटेलात रूमबॉय म्हणून काम करत असला तरीही गावाकडची नाळ जपतच हा राहिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्यावर खूप प्रभाव. त्यामुळे अन्याय म्हटलं की पेटून उठू लागला.

या वर्षी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आणि त्याच्या नावाची गावातल्या तरुणात चर्चा सुरू झाली; पण आता ग्रामपंचायत निवडणुकीतही जेवणावळी, सहली, भेटवस्तूंचा ट्रेंड आल्यामुळे ही निवडणूक आपल्याला परवडणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली; पण गावातल्या पोरांनी त्याने आपण निवडणूक पैशावर नव्हे, तर आपल्या तरुणाच्या जिद्दीवर असेल, अशी त्याला ग्वाही दिली. मित्रांच्या जिद्दीच्या जोरावर त्याने फॉर्म भरला. फक्त हात जोडून प्रचार केला व निवडणुकीत आनंदा ६५ मताने निवडून आला.

तो निवडून आला. गुलालाने न्हाऊन निघाला. दोन दिवस गावात थांबला आणि एक दिवशी सकाळी हॉटेलात पुन्हा कामावर हजर होण्यासाठी कोल्हापुरात आला. हॉटेलमधला रूमबॉयचा ड्रेस चढवला आणि रूमबॉय म्हणून जे जे काम असते, ते करू लागला.

वरवर रूमबॉय म्हणून त्याला चिल्लर असे ओळखण्याची बहुतेकांची सवय असते; पण हा आनंदा खूप वेगळा आहे. त्याच्या मते जे काम आपल्याला भाकरी देते, ते काम सन्मानाचे आहे. रूमबॉय म्हणून कमीपणा मानने म्हणजे चूक आहे. ग्रामपंचायतीला निवडून आल्यावर हॉटेलातले काम सोड, आता पुन्हा फरशा पुसणार काय? असे प्रश्‍न त्याला काहींनी विचारले; पण तो ठामपणे ‘‘होय मी पडेल ते काम करणार’’ असेच उत्तर देतो. तो आता सुटी दिवशी गावात जातो. ग्रामपंचायत बैठकीच्या वेळी नोकरीची वेळ ॲडजस्ट करतो.

त्याच्या मते त्याने बिनपैशाची निवडणूक लढवली व जिंकली. हाच प्रवाह सगळीकडे आला पाहिजे. कारण पैसे, पाकीट, दारू, जेवणावळी यावर मते मिळवून निवडून आलेल्यांपेक्षा साध्या माणसाचा विजय लाखमोलाचा आहे.

ग्रा. पं. सदस्य मूळ काम मनापासून... 
तो पॅव्हेलियन हॉटेलमध्ये रूमबॉय आहे. ग्रामपंचायत सदस्य झाल्यावरही तो त्याचे मूळ काम मनापासून करतो. हॉटेलचे सिद्धार्थ लाटकर, श्रेयस घाटे व संजय प्रभावळकर यांच्या सहकार्याबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT