विसर्जन मिरवणुकीसाठी यंत्रणा सज्ज
इचलकरंजीत ७५० वर पोलिस राहणार तैनात ः सीसीटीव्हीचाही वॉच
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ : लाडक्या बाप्पाला निरोप देताना गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची विशेष तयारी केली आहे. शहरातील विसर्जनाच्या पारंपरिक मार्गांसह शहापूर खण मार्ग तसेच रस्त्यारस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त आहे. अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस अंमलदार, होमगार्ड, स्ट्रायकिंग, राज्य राखीव पोलिस दल, राखीव पोलिस दल अशा सुमारे ७५० पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. सेक्टर पोलिसिंगच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वॉच राहणार आहे.
बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन मंगळवारी (ता. १०) अनंत चतुर्दशीच्या पर्वावर केले जाणार आहे. यासाठी विसर्जनाच्या प्रमुख मार्गावर शिवतीर्थ चौक, मलाबादे चौक, गांधी पुतळा, राजवाडा चौक, नदीवेस रोड आदी ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी गांधी पुतळा व शिवतीर्थ चौक येथे पोलिस मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. पोलिसांची ध्वनिप्रदूषण पथके प्रमुख चौकात असणार आहेत. प्रमुख चौकात पोलिसांनी आधीच किमान ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची तीव्रता निश्चित करून पंचनामे करून ठेवले आहेत. आधुनिक डॉल्बी सिस्टीम, लेसरवर नेटका वॉच राहणार आहे.
वॉच टॉवरवरून मिरवणुकीकावर लक्ष असणार आहे. दोन वायरलेस कक्षासह दुर्बीण, वॉकीटॉकी, राहुटी तैनात आहेत. मिरवणूक मार्गावर वाहतुकीवर कोणताही प्रभाव निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांना विशेष सूचना दिल्या आहेत. विसर्जन मार्गावर वाहनांना बंदी असल्याने वाहनधारक मार्गालागतच मोठ्या प्रमाणात पार्किंग करतात. अत्यावश्यक सेवांसाठी विसर्जन मार्गाला जोडणाऱ्या पोट रस्त्यावर वाहन पार्किंग करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अशा सर्व पोट रस्त्यांवर वाहन पार्किंग न करण्याचे आवाहन केले आहे. केल्यास कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
....
चौकट...
वाहतूक मार्गात बदल
विसर्जन मिरवणुकीसाठी शिवतीर्थमार्गे गांधी पुतळा, राजवाडा चौक ते नदीवेस मार्ग हा पारंपरिक मार्ग खुला असणार आहे. तसेच इचलकरंजी - शहापूर हाही मार्ग खुला राहील. पारंपरिक विसर्जन मार्ग एकेरी राहणार असून, मिरवणुकीतील वाहनांना या मार्गावर परतीच्या प्रवासाला बंदी राहील. सांगली नाकामार्गे शहरात येणारी वाहतूक सीईटीपी रोड थोरात चौकमार्गे शहरात येईल. हुपरी, कर्नाटक, कागल या मार्गावरून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. एसटी सेवा ही पंचगंगा पुलापर्यंत मर्यादित राहील.
..........
काही विशेष उपाययोजना
* डेकोरेशन नसलेल्या व मिरवणुकीत सामील न झालेल्या मूर्तीचे प्राधान्याने विसर्जन
* विसर्जनस्थळी येण्यापूर्वी मूर्तीचे डेकोरेशन विलगीकरण होणार
* क्रेन बंद पडल्यास राखीव क्रेनची व्यवस्था
* मलाबादे चौक व गांधी पुतळा चौकात स्वतंत्र स्कॉड नेमून मिरवणुका मार्गस्थ करण्याची व्यवस्था
* अधिकाधिक ध्वनी प्रदूषणाचे खटले पाठवण्याचे नियोजन
* झेंडा चौक की मुरगूबाई मंदिर या अरुंद रस्त्यावर वीजपुरवठ्यासाठी जनरेटर व प्रकाशाची व्यवस्था
* पहाटेच्या वेळी गांधी पुतळा ते पंचगंगा नदीघाट मार्गावर वाहतूक नियोजनासाठी १० जणांचे राखीव पथक.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.