20202
गडमुडशिंगी ः येथील दांगट मळ्यातील गडमुडशिंगी येथील नरसिंह मंदिराचे संग्रहित छायाचित्र. हे मंदिर रविवारी विहिरीत कोसळले. या घटनेत बुडालेल्या कृष्णात दांगट यांचा शोध घेताना दिनकर कांबळेंसह, अग्निशमन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
04068
कृष्णात दांगट
मंदिर विहिरीत कोसळून एक बुडाला
गडमुडशिंगी येथील घटना; आज पुन्हा शोधमोहीम राबवणार
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. २० : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दांगट मळ्यातील नरसिंह मंदिर आज सकाळी अचानक विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकजण बुडाला. कृष्णात उमराव दांगट (बटू अण्णा) (वय ६४) असे त्यांचे नाव आहे. जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधमोहीम सुरू होती. परंतु, त्याला यश आले नाही. दुर्घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, कृष्णात दांगट हे शेतकरी असून, त्यांच्या शेतातील विहिरीशेजारी कुलदैवत नरसिंह मंदिर आहे. या ठिकाणी ते दररोज सकाळी पूजा केल्यानंतरच शेतीच्या कामाला लागत असत. या शेतात त्यांचा चार म्हैशींचा गोठाही आहे. दांगट हे नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेनऊच्या पूजेसाठी मंदिरात आले. परंतु, अचानक हे मंदिर विहिरीत कोसळले. याबरोबर तेही खाली कोसळले व विहिरीत बुडाले. ही बातमी काही क्षणातच वाऱ्यासारखी गावात पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे मोठी गर्दी झाली.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. याबाबत जीवरक्षक दिनकर कांबळे यांना कळविल्यानंतर तेही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्कुबा किटसह चार ते पाच वेळा विहिरीत उतरून दांगट यांचा शोध घेतला. परंतु, ३० फूट खोल विहिरीतील गाळ, दाट पसरलेल्या वनस्पती आणि त्यात कोसळून उलटे पडलेले मंदिर, तसेच विहिरी शेजारी झालेली दलदल याचा शोध कार्याला अडथळा येत होता. रात्री उशिरापर्यंत या शोध कार्यात यश आले नाही. अंधारामुळे हे शोधकार्य थांबविण्यात आले. उद्या (ता. २१) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, हे मंदिर विहिरीच्या काठावर चार कॉलमवर बांधण्यात आले होते. जोरदार पाऊस व अतिवृष्टीमुळे या मंदिराचा पाया कमकुवत होऊन हे मंदिर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
...............
कुटुंबीयांवर आभाळच कोसळले...
कृष्णात दांगट यांना दोन मुले, एक विवाहित मुलगी, सून आणि नातू असा परिवार आहे. मुले शेतीबरोबरच कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. या कुटुंबासाठी कुलदैवत नरसिंह मंदिर केवळ आस्थेचा नव्हे, तर श्रद्धेचा भाग होते. परंतु, हे मंदिरच विहिरीत कोसळले व कुटुंबप्रमुखही बुडाल्याचा धक्का संपूर्ण कुटुंबाला बसला आहे. त्यांच्या ओलावलेल्या डोळ्यांकडे पाहून उपस्थितही गलबलून गेले. मंदिर विहिरीत कोसळून कुटुंबीयांवर आभाळच कोसळले, अशी चर्चा घटनास्थळी होती.
............................................
चौकट:
आपत्ती व्यवस्थापन नावालाच...
घटनास्थळी दाखल झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांकडे शोध कार्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शोधकार्य करताना त्यांच्या मर्यादा उघड झाल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे तर स्कुबा ड्रायव्हिंगचे किटही नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ग्रामस्थांकडून या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
................................
आमदार ऋतुराज पाटील यांनी
साधला दिनकर कांबळेंशी संपर्क
कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना घटनेची माहिती समजताच ते या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याबरोबरच बचाव कार्याला गती दिली. याचबरोबरच राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण सोनवणे, रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, अरुण शिरगावे यांच्यासह गावातील स्थानिक नेते ही घटनास्थळी आले व शोधकार्य गतीने पार पडावे यासाठी प्रयत्न करीत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.