04128
आदमापूरला बाळूमामांची बकरी पूजन
कार्यक्रमास हजारो भाविकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. १६ : आदमापूर (ता. भुदरगड) येथे दीपावली पाडव्यादिवशी बाळूमामांच्या बकरी पूजन, लेंडी पूजन व बकरी भुजवण्याचा धार्मिक कार्यक्रम उत्साही वातावरणात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बाळूमामांच्या नावानं चांगभलं...चा अखंड जयघोष झाला.
बाळूमामांनी सुरू केलेली बकरीपूजन व बकरी भुजवणे ही परंपरा आजही भक्तिभावाने होते. बाळूमामा मंदिरातून मानकरी राजनंदिनी धैर्यशीलराजे भोसले यांच्याहस्ते वाद्यांच्या गजरात भंडारा आणला. यावेळी शिवराज नाईकवडे, नागाप्पा मिरजे, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे उपस्थित होते. मरगुबाई मंदिर आवारात बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंड्यांची रास करुन ती विविध फुलांनी सजवली होती. सभोवती गवळण्या घातल्या होत्या. या राशींचे विधिवत पूजन झाले. बाळूमामांच्या कळपातील बकरी प्रातिनिधिक स्वरुपात भुजवण्यासाठी (पळवणे) आणली होती. यावेळी सुवासिनींच्या हस्ते बकऱ्यांचे पूजन केले. बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण झाली. यावेळी दूध उतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे भाविकांच्या नजरा होत्या. ही प्रथा बाळूमामांनी सुरू केली होती. ज्या दिशेला दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस, पीकपाणी उत्तम राहते, अशी लोकभावना आहे. यावर्षी पश्चिम दिशेला दूध बाहेर गेल्याने हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार असे समजले गेले. यावेळी भक्तांनी आणलेल्या दिवाळी फराळासह महाप्रसादाचे वाटप झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.