पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात भाजप बिनचेहऱ्याचाच!

प्रवीण जाधव

सातारा - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याला अवघा महिना उरला असताना अद्यापही खासदारकीचा चेहरा कोण, याचे उत्तर देण्यात भारतीय जनता पक्ष अपयशी ठरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. गेली चार वर्षे संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केलेल्या पदाधिकाऱ्यांची झालेली ही कोंडी मुख्यमंत्री फोडणार कधी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. निवडणुकांची लगीनघाई तोंडावर आल्यामुळे सर्वच पक्षांच्या तयारीने वेग घेतला आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यासारखीच परिस्थिती आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यातील सूचक कृतीतून ते स्पष्ट होत आहे. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यातूनही त्याचा खुलासा झालेला आहे. त्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनीही पावले टाकायला कधीच सुरवात केली आहे. मतदारसंघामध्ये त्यांचे दौरे वाढले आहेत. राष्ट्रवादी अंतर्गत बांधणीबरोबरच त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यावर धामधूम वाढणार आहे. कोणत्या टप्प्यात निवडणुका होतात, यावरही प्रचारासाठी मिळणारा वेळ अवलंबून असणार आहे. त्यामुळे सध्याचा कालावधी हा इच्छुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीत सक्रियता दिसत असली तरी, भाजपच्या गोटात मात्र, अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूथ प्रमुखांशी नुकतीच चर्चा केली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने विधानसभेबरोबर लोकसभेची जागा जिंकण्याचा विश्‍वास त्यांना दिला. गेली साडेचार वर्षे संघटन बांधणीसाठी जिल्हाभर केलेल्या कामाच्या व त्यातून निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांच्या फौजेच्या जोरावर त्यांनी हा शब्द दिला खरा. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये भाजपच्या धुरिणांना अद्याप लोकसभेसाठी चेहरा लोकांसमोर आणता आलेला नाही. उमेदवार नाही तर मला मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नागरिकांना करत आहेत.  परंतु, कोणाच्या माध्यमातून मोदींना मत द्यायचे, हे अद्याप सातारकरांसमोर आले नाही. मुळात युतीचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मतदारसंघ कोणाकडे जाणार, इथपासून संभ्रमाला सुरवात आहे. त्यात उदयनराजेंच्या मुत्सदेगिरीने आणखी भर पडत आहे. राष्ट्रवादीतून उमेदवारी करणार हे पक्के असूनही अद्याप त्यांनी भाजपवाल्यांच्या जाळ्यात अडकवण्याच्या अपेक्षांना सुरूंग लागू दिलेला नाही. जाहीर कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री व शासनाचे कौतुक करून निदान लोकांमध्ये तरी असे वातावरण जिवंत ठेवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. पाटणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना अक्षता टाका असे सांगत मागील निवडणुकीत वापरलेले ‘रिपाइं’ अस्त्रही पुन्हा चाचपण्यास ते विसरलेले नाहीत. त्यातच उदयनराजे राष्ट्रवादीतून लढले तर आम्ही उमेदवार देणार, हे शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावतेंनी साताऱ्याच्या दौऱ्यात जाहीरही केले. या सर्व परिस्थितीमुळे भाजपचा मतदारच काय, कार्यकर्त्यालाही अद्याप दिशा स्पष्ट झालेली नाही. राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदयनराजेंना लढत देणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी केवळ मोदी लोकांपर्यंत पोचून उपयोग होणार नाही. उमेदवारही लोकांच्या पचनी पडला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे. त्यासाठी पुरेसा वेळ पाहिजे. तोच आता भाजपच्या हातातून निसटून चालला आहे.  

आज मुख्यमंत्र्यांकडून उत्तराची कार्यकर्त्यांची अपेक्षा उद्या (ता. चार) मुख्यमंत्री खंडाळ्यामध्ये मदन भोसले यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे श्री. भोसले भाजपत येणार का, लोकसभेचे उमेदवार असणार का, अशी चर्चाही रंगलेली आहे. परंतु, स्पष्ट काहीच होत नाही. त्यामुळे कार्यक्रर्त्यांमधील उत्साहावर पाणी पडत आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची झालेली ही कोंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडणार का? असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात आहे. साताऱ्यात भाजप लढणार की जागा रिपाइंला जाणार, याचे उद्याच्या कार्यक्रमात तरी मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी जनतेसह कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT