सांगली -महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याविरोधात तसेच प्रभाग १२ मधील सफाई कर्मचाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात ठिय्या मांडूनही त्यांची तक्रार घेतली नाही. तसेच संशयितासही अटक केली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले. २४ तासात संशयितावर कारवाई करावी अशी मागणी केली.
सभागृह नेते युवराज बावडेकर यांना याबाबतचे निवेदन दिले. पोलिसांनी संशयित पटेल याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, काम बंद आंदोलनामुळे आज बाजारपेठेतील कचरा सायंकाळपर्यंत तसाच पडून राहिला.
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास एका व्हॉटस्ॲप ग्रुपवर आयुक्तांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट पडली. महापालिकेतील एका कर्मचाऱ्याकडे ही पोस्ट आली. अत्यंत खालच्या भाषेचा वापर केलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास उपायुक्त स्मृती पाटील यांसह सर्व अधिकारी-कर्मचारी तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यासमोर गोळा झाले. सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी लेखी तक्रार दिली. पण, ठाणे अंमलदारांनी फिर्याद देण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाइन फिर्याद घेतली. मात्र, कलम कोणते लावायचे यावरून गोंधळ सुरू राहिला.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. पहाटे अडीच ते तीन वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. संशयिताला आमच्यासमोर चौकशीसाठी ताब्यात घ्या, अशी मागणी अधिकारी, कर्मचारी करत होते. पोलिसांनी सकाळी येऊन एफआयआरची कॉपी घेऊन जा असा सल्ला दिला.
आज सकाळी सर्व अधिकारी, कर्मचारी महापालिकेत गोळा झाले. संशयितास अटक करत नाही तोवर काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केले. दरम्यान, संशयित पटेल यानेच पहाटे सव्वा एक वाजता चौकशी झाल्याची पोस्ट पोलिस ठाण्यातील ताबा पावतीसह सोशल मिडियावर टाकली. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी संतप्त झाले. पहाटे अडीच ते तीन वाजेपर्यंत तेथे आम्ही होतो. पण, संशयितास चौकशीसाठी आणले नव्हते. मग चौकशी झाली कशी? कधी केली? कुठे केली? याची माहिती पोलिसांनी द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
तसेच मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, महापौर, आयुक्त, विरोधीपक्ष नेते, गटनेते यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.