सांगली : महापालिकेत सोनेरी टोळी निर्णय घेत असून महापौर नामधारी झाले आहेत. बाह्य हस्तक्षेप वाढला आहे. प्रशासनाला हाताला धरून अंदाजपत्रकात भाजप सदस्यांची कामे उडवण्याचा प्रकार केला आहे. येत्या महासभेत महापौरांना याचा जाब विचारणार. महासभा चालू देणार नाही. दंडुकशाही केल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा आज भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी दिला.
महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात भाजप सदस्यांच्या निधीला कात्री लावली आहे. त्याचबरोबर सदस्यांची बायनेम कामे वगळली आहेत. यामुळे भाजप सदस्यांमध्ये संतापाची भावना आहे. आज भाजपच्या सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी सभापती पांडुरंग कोरे, युवराज बावडेकर, जगन्नाथ ठोकळे यांनी पत्रकार बैठकीत राष्ट्रवादीच्या कारभारावर झोड उठवली.
सिंहासने म्हणाले, स्थायी समितीने ३१ मार्च रोजी महापालिकेचा वास्तवदर्शी अर्थसंकल्प महापौरांना सादर केला होता. यामध्ये महापौरांनी ३७ कोटींची वाढ करुन तो सप्टेंबरमध्ये दिला. मुळात सहा महिने उशिरा अर्थसंकल्प दिल्याबद्दल आम्ही याचा निषेध करतो. या अर्थसंकल्पात पक्ष बघून सदस्यांना वेगवेगळा निधी देणारे हे इतिहासातील पहिले महापौर ठरले आहेत. यापूर्वी कधीही सदस्यांना निधीत दुजाभाव केला जात नव्हता. मात्र यंदा हा प्रकार घडला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेतून महापालिकेला शंभर कोटी रुपये दिले. तेव्हा भाजपने शहरांचा समान विकास होण्यासाठी सर्वांना समान निधी दिला होता.
धीरज सूर्यवंशी म्हणाले, घोडेबाजार करून सत्तेत आलेल्याना जनतेशी देणेघेणे नाही विकासाशी देणेघेणे नाही त्यांनी बाय नेमची कामे कमी करताना मर्जीतल्या नगरसेवकांची कामे ठेवली आहेत. पंचशील नगरमधील रस्ता, कुपवाडसाठी ट्रीमिक्स रस्ता, पूरग्रस्त भागातील रस्ते आदी आवश्यक कामे कमी केली आहेत.
भाजप सदस्यांची कामे कमी करून केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या निधीतून कामे झाल्याचा देखावा जनतेसमोर करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र जनता भाजपच्या बाजूनेच आहे.पालकमंत्र्यांनी सूचना देऊनही कुपवाड ड्रेनेज योजनेच्या ठरावावर महापौरांनी गेली दोन महिने सही केली नाही जनतेला महापौर वेठीस धरत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.
पांडुरंग कोरे म्हणाले, भाजपचा महापौर असताना २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पदाधिकाऱ्यांना निधी वाटपात भेदभाव केला नव्हता. त्यावेळी महापौरांना सहा कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांना प्रत्येकी चार कोटी तर सभागृह नेते, गटनेते, विरोधी पक्ष नेते यांना प्रत्येकी चार कोटी असा समान निधी दिला होता. मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांनाही निधीत दुजाभाव केला आहे. शिवाय निधीही कमी दिला आहे.
दादांच्या समाधीला निधी नाही हा अपमान
केवळ सांगली जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते राहिलेल्या वसंतदादांच्या समाधीच्या दुरुस्तीसाठी या अंदाजपत्रकात एक कोटींची मागणी करूनही केवळ दहा लाख निधी दिला आहे. हा जिल्ह्याचा अपमान आहे.
बंगला, फार्म हाऊसमध्ये केलेले बजेट
सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेत सोनेरी टोळी निर्णय घेत आहे. बंगला, फार्म हाऊस येथे बसून केलेले बजेट दिसते. महापौरांनी बालिशपणा सोडावा आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. यात सुधारणा झाली नाही तर नागरिक महासभेत घुसतील. सध्या महापालिकेत ऐनवेळचे विषय, उपसूचना घुसडणे असे प्रकार चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्थायीत परतफेड करू
स्थायी समिती आमच्या ताब्यात आहे. अंदाजपत्रकात भाजपवर केलेल्या अन्यायाची परतफेड तेथे करू. अंदाजपत्रकातील कामे मंजुरीसाठी स्थायीकडे येणार आहेत हे लक्षात ठेवा असा गर्भित इशाराही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.