सांगली : संशयित आरोपी युवराज कामटेच्या घराची झडती घेण्यासाठी रविवारी त्याला घेऊन जाताना पोलिस.
सांगली : संशयित आरोपी युवराज कामटेच्या घराची झडती घेण्यासाठी रविवारी त्याला घेऊन जाताना पोलिस. 
पश्चिम महाराष्ट्र

वर्दीतील क्रौर्य...सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणारा ताब्यात

सकाळवृत्तसेवा

सांगली - अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यूदिवशी शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्हीचे फुटेज नष्ट करणाऱ्यास सीआयडीने ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात आली. आज दिवसभर संशयितांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. मात्र ते घटनेच्या मुद्द्यावर बोलण्याचे टाळत होते. युवराज कामटेसह तिघांच्या घरांवर आज सीआयडीच्या पथकाने छापे टाकले.

शहर पोलिस ठाण्यात लुटीच्या आरोपावरून अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे याचा डीबी रूममध्ये उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळण्यात आला. या खळबळजनक घटनेनंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला. सीआयडीने या घटनेतील डीबी रुम, विश्रामबाग पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे अन्वेषण या ठिकाणी असलेला, तसेच आंबोलीत मृतदेह जाळलेल्या ठिकाणचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यामध्ये कागदपत्रांच्या झेरॉक्‍स, आरोपींचे कपडे, गाड्या यांचा समावेश आहे. यातील नसरुद्दीन मुल्ला याची पल्सर गाडी अद्याप मिळालेली नाही.
ताब्यात घेतलेल्या गाड्यांची फॉरेन्सिक तपासणी झाली आहे. मात्र, त्याचा अहवाल अजून मिळालेला नाही. सीआयडीचे महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दोन दिवसांत सर्व आरोपी, निलंबित पोलिस कर्मचारी यांची चौकशी केली.

मूळ मुद्द्याला बगल मुख्य संशयित आरोपी उपनिरीक्षक युवराज कामटे, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, झाकीर पट्टेवाले, रोहित शिंगटे, अनिल लाड यांचे जबाब नोंदवण्याचे काम आज सुरू होते. हे आरोपी चौकशीत सहकार्य करत नाहीत. त्यांची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीतजास्त माहिती काढून घेण्याचा सीआयडीचा प्रयत्न सुरू आहे. हे आरोपी इतर माहिती सांगतात. मूळ घटनेबाबत मात्र ते काही बोलत नाहीत. त्याला बगल देण्याचा प्रयत्न असतो.

अनेक शंका
शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा घटनेदिवशी बंद होती की त्यातील फुटेज नष्ट केले, याबाबत अनेक शंका होत्या. मात्र, या सीसीटीव्हीतील फुटेज नष्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे. ते नष्ट करणारा व्यक्ती निष्पन्न झाला असून, सीआयडीने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

खत्री, लोहाना यांचे जबाब
अनिकेतच्या नातेवाइकांनी आक्षेप घेतलेल्या लकी बॅग्जचा मालक नीलेश खत्री आणि दुसरा गिरीश लोहाना यांचीही सीआयडीने चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या घटनेशी त्यांचा काही संबंध आहे का ते पडताळून पाहण्यात येत आहे.

आरोपींवर अवलंबून नाही
आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत. जबाब देताना ते मुख्य घटनेबद्दल बोलत नाहीत. परंतु, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांचे जबाब रेकॉर्ड करत आहे. त्यांच्या वर्तणुकीतून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. त्यांच्यावर आम्ही एक टक्काही अवलंबून नाही, असे सीआयडीचे अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत सुमारे ३० जणांचे जबाब घेतले आहेत. आरोपींना मदत करणाऱ्यांचेही जबाब घेतले आहेत. त्यांची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती, यावरून त्यांना साक्षीदार करायचे की आरोपी ते निश्‍चित करण्यात येईल, असे गायकवाड म्हणाले.

महानिरीक्षकांची आंबोलीस भेट
सीआयडीचे महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी काल दिवसभर उपअधीक्षक दीपाली काळे यांची चौकशी केली. सायंकाळी अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही त्यांनी चौकशी केली. त्यानंतर आज त्यांनी आंबोलीत जाऊन अनिकेतचा मृतदेह जाळलेल्या घटनास्थळाची पाहणी केली.

तिघांच्या घरांवर छापा
या घटनेतील संशयित आरोपी उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या स्फूर्ती चौकातील घरावर आज दुपारी सीआयडीच्या पथकाने छापा टाकून घराची झडती घेतली. या वेळी कामटेलाही कडेकोट बंदोबस्तात आणले होते. तसेच नसरुद्दीन मुल्ला आणि अरुण टोणे या दोघांच्याही घरांवर छापा टाकून झडती घेतली. या ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

मुंबईत आज मुख्यमंत्र्यांची बैठक
कोथळेच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी मुंबईत सोमवारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूरचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी महासंचालकांना दिलेला अहवाल, अतिरिक्त महासंचालक (कायदा सुव्यवस्था) बिपीन बिहारी, अतिरिक्त महासंचालक (सीआयडी) संजयकुमार, सीआयडीचे महानिरीक्षक सुनील रामानंद या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगलीत येऊन या प्रकरणातील सर्व आरोपी, निलंबित पोलिस कर्मचारी, फिर्यादी, कोथळे कुटुंबीय यांची चौकशी करून जबाब घेतले आहेत. या सर्व विषयांवर उद्या बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

ते दोघे अद्याप बेपत्ता
घटनेदिवशी अनिकेतचा साथीदार अमोल भंडारे याला कृष्णा घाटावर सुमारे दोन तास दोन व्यक्ती घेऊन थांबल्या होत्या. मात्र त्या दोन व्यक्ती कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT