पश्चिम महाराष्ट्र

विनाऔषध उपचार सुरू; जिल्हा रुग्णालयात स्थिती

प्रवीण जाधव

सातारा -  ताप, सर्दी-खोकला या आजारांबरोबर "स्वाइन फ्लू'ने थैमान घातले आहे. त्याला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सर्व सज्जता असल्याचा दावा पत्रकार परिषद घेऊन केला. प्रत्यक्षात मात्र, साधी-साधी औषधेही जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विनाऔषध सुरू आहेत उपचार, असे म्हणायची वेळ आली आहे. कागदोपत्री पूर्ततांची पाहणी करण्यात धन्यता मानणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या जिवाशी चाललेला हा खेळ कधी कळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अन्यथा रुग्णांच्या जिवाशी चाललेला हा खेळ अनेकांच्या बळींना कारणीभूत ठरण्याची शक्‍यता आहे. 

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 
जिल्ह्यात सध्या साथरोग, ताप, खोकला, सर्दी हे व्हायरल आजार व त्याचबरोबर स्वाइन फ्लूनेही थैमान घातले आहे. खासगी असो वा सरकारी सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रुग्णालयात तर, दररोज हजारो रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत आहेत. आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. "स्वाइन फ्लू'ने त्या भीतीत आणखी भर घातली आहे. त्यामुळेच विविध प्रकारच्या अफवांचे पेवही फुटू लागले आहे. 

प्रशासकीय यंत्रणांचा तोंडी कारभार 
वाढत्या आजारांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने मात्र, नेहमीप्रमाणे सज्जतेची तत्परता दाखविली. आढावा-बैठका झाल्या. कागदोपत्री सज्जतेचे अहवाल तयार झाले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये या आजारांचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे जाहीर करण्यात आले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्‍वस्त केल्याने इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सर्व काही झाले या अविर्भावात निवांत आहेत. 

औषधेच नाहीत तर, उपचार कसले करणार? 
सर्व सज्जता झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात सर्वांत महत्त्वाच्या अशा जिल्हा रुग्णालयातच औषधांची बोंबाबोंब झालेली आहे. लहान मुले असो वा ज्येष्ठ सर्वांनाच सर्व आजारांसाठी लागणारी औषधे उपलब्ध नाहीत. ताप-सर्दी-खोकल्याच्या साध्या आजारासाठी दिली जाणारी ऍण्टीबायोटिक जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. ताप व सर्दीच्या गोळ्या देऊन ऍण्टीबायोटिक बाहेरून आणायला सांगितली जात आहेत. त्यामुळे औषधेच नसली तर, उपचार कसे होणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. खासगीतील खर्च परवडत नसल्याने नागरिक शासकीय रुग्णालयात येतात. मात्र, इथेही बाहेरून औषधे आणायला लावल्यावर काय करायचे, असा प्रश्‍न रुग्णांसमोर निर्माण झाला आहे. 

अलगीकरण कक्ष कुठे आहे? 
"स्वाइन फ्लू' हा संसर्गजन्य आजार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पहिल्यापासून या रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. मात्र, यंदा तशी सुविधा उपलब्ध केलेली नाही. पत्रकार परिषदेत 18 बेडचा अलगीकरण विभाग सज्ज असल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रत्यक्षात पुरुष वैद्यकीय विभाग (वॉर्ड क्रमांक दोन) मध्येच "स्वाइन फ्लू' झालेल्या व संशय असलेल्या रुग्णांना ठेवण्यात आले आहे. अन्य आजाराचे रुग्णही त्याच वॉर्डात आहेत. त्यांना दाखल करायला गेले की परिचारिका सांगतात, इथे "स्वाइन फ्लू'चे रुग्ण आहेत, तुमच्या जबाबदारीवर ऍडमिट व्हा आणि नाकाला कायम रूमाल बांधा. या सल्ल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हापकी बसत आहे. भीतीच्या छायेतच त्यांना तिथे राहावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचे सर्व दावे चुकीचे ठरत आहेत. जिल्हा रुग्णालयाचीच अशी अवस्था असेल तर, अन्य शासकीय रुग्णालयांचे काय बोलावे. काही वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीही स्वतंत्र वॉर्डची आवश्‍यकता नसल्याचे सांगतात. त्यामुळे नक्की काय चालले आहे, असा प्रश्‍न पडतो. 

खासगीपेक्षा सरस उपचार 
वास्तविक "स्वाइन फ्लू'वर खासगीपेक्षा शासकीय रुग्णालयात चांगला उपचार होत असल्याचा आजवरचा रुग्णांचा अनुभव आहे. तातडीने निदान व उपचार होत असल्याने तेथे रुग्ण दगावण्याची शक्‍यता कमी असते. असे असताना चुकीच्या नियोजनाअभावी रुग्णांची परवड होताना दिसत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

नागरिकांना वाली कोण? 
अच्छे दिन...चा वादा करत भाजपचे सरकार सत्तेत आले. मात्र, सुरवातीपासून आरोग्य विभागाला बुरे दिन... सुरू झाले आहेत. सध्या तर आरोग्य विभागाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. कोणत्या तरी, घोटाळ्याचा हवाला देत या शासनाने औषधे खरेदी बंद केली. त्यानंतर एका कंपनीला याचे टेंडर द्यायला एक वर्ष लावले. टेंडर दिले तरी दोन वर्षे झाले औषध पुरवठा सुरळीत झालेला नाही. आरोग्य सुविधेबाबत एवढी चुकीचा कार्यपद्धती या पूर्वीच्या शासनात कधीही दिसली नव्हती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे बिकट झाले आहे, हे निश्‍चित. त्याची सत्ता पक्षातील लोकप्रतिनिधींनाही चाड वाटत नाही आणि त्याबाबत आवाज उठविण्याचे काम विरोधकांकडूनही होताना दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT